नाशिक – नाशिक पुरोहित संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी प्रदीर्घ काळापासून सतीश शुक्ल यांच्याकडे होती. या काळात सभासद नोंदणी झाली नाही. शुक्ल यांच्या एकतर्फी कारभाराला वैतागून मागील महिन्यात त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला. पुरोहित संघाच्या सर्वसाधारण सभेत सतीश शुक्ला यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचला गेला. संघाचे अध्यक्ष म्हणून चंद्रशेखर पंचाक्षरी यांना उपस्थितांनी एकमुखाने पाठिंबा जाहीर केला. या सभेत ३८ वर्षानंतर नव्याने सभासद नोंदणी सुरू करण्यात मान्यता देण्यात आली.

पुरोहित संघाची सर्वसाधारण सभा शौनकाश्रम येथे पार पडली. सभेत माजी अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्या विरोधात अनेक गंभीर तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. मात्र वादात न अडकता संघाच्या प्रगतीच्या दृष्टीने काम झाली पाहिजे, पुरोहित संघाचे स्वतःची धर्मशाळा हवी, अशी मागणी सदस्यांनी केली. माजी अध्यक्ष शुक्ल हे वस्त्रांतर गृह आणि पुरोहित संघाचे कार्यालय वैयक्तिक मालमत्ता असल्यासारखे वापरत असल्याचे टिकास्त्र सभासदांनी सोडले. त्यांच्या कार्यकाळात पुरोहित संघाच्या स्वतःच्या मालमत्तेत कोणतीही वाढ झाली नाही, तसेच सामाजिक दायित्व निधीतून कोणताही निधी आणला गेला नाही.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, संस्थेची स्वतःची पाठशाळा नसल्याची खंतही यावेळी व्यक्त झाली. पुरोहित संघाच्या वस्त्रांतर गृहाचा वापर पावसाळ्यात पुराचे पाणी आल्यावर कर्मकांडासाठी केला जातो, परंतु यासाठी संघाची मोठ्या रकमेची पावती फाडावी लागते, यावरही काही सदस्यांनी आक्षेप घेतला. काही पूजाविधीसाठी २०० रुपये दक्षिणा मिळते. त्यासाठी तितक्याच रकमेची पावती फाडावी लागते, याकडे काहींनी लक्ष वेधले. यावेळी शेखर शुक्ल, प्रमोद दीक्षित, महेश शुक्ल, नितीन पाराशरे, सुनील गर्गे, मंदार शिंगणे, विनायक पाराशरे या सदस्यांनी विविध सूचना मांडल्या. सभेची सुरुवात शांतीसूक्त पठणाने झाली. व्यासपीठावर सचिव वैभव दीक्षित, अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, उपाध्यक्ष शेखर शुक्ल उपस्थित होते.

मागील चार दशकांपासून पुरोहित संघाचे अध्यक्षपद सतीश शुक्ल यांच्याकडे होते. त्यांच्या कार्यकाळात सभासद नोंदणी बंद होती. यामुळे पुरोहित संघाचे मागील ३८ वर्षात मजबूत संघटन होऊ शकले नाही. नाशिक पुरोहित संघाचे संघटन वाढविण्यासाठी नव्याने सभासद नोंदणीचा विषय सभेत चर्चेत आला. यावर चर्चा होऊन त्यास मान्यता देण्यात आल्यामुळे ३८ वर्षानंतर पुरोहित संघात सभासद नोंदणी होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सभासद नोंदणींचा लाभ भाविकांनाही

ज्यांच्यांकडे पूर्वापार वंशावळी आहेत, अशी तीर्थ पुरोहितांची नाशिकमध्ये ३५० घराणी आहेत. ते रामकुंड तीर्थावर पौरोहित्य करू शकतात. मागील सिंहस्थात पुरोहित संघाकडे २२५ सभासद अर्थात पुरोहितांची नोंद आहे. तीर्थ पुरोहितांकडे देशातील वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या भाविकांची वंशावळी असते. विशिष्ट समाजघटकांचे तीर्थ पुरोहित निश्चित आहेत. नाशिकला तीर्थाटनाला येताना संंबंधितांकडून आपल्या तीर्थ पुरोहितांना पूर्वकल्पना दिली जाते. मग येथे पूजाविधी केल्या जातात. पुरोहित संघाच्या नव्या सभासद नोंदणीचा लाभ आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांना निश्चितपणे होईल, असे नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी सांगितले.