नाशिक : शहरातील वेगवेगळ्या भागात तीन दिवसांपासून कृत्रिम पाणी टंचाईला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग (पाणी पुरवठा) यांच्या वतीने शनिवारी दुरूस्तीची कामे युध्दपातळीवर हाती घेण्यात आली. मात्र तांत्रिक चुकांमुळे ही कामे पुन्हा करण्याची वेळ पाणी पुरवठा विभागावर आल्याने जुना गंगापूर रोड तसेच निलगिरी बाग परिसरास मंगळवारीही टंचाईला सामोरे जावे लागले. या गैरसोयींमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

सध्या नाशिककरांची अवस्था धरण उशाला आणि कोरड घशाला अशी आहे. शहर परिसरात संततधार सुरु असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करणे भाग पडले असतांना नाशिककरांची मात्र पिण्याच्या पाण्यासाठी मारामार होत आहे. शहरातील कृत्रिम पाणी टंचाई दूर करण्यासाठी जलशुध्दीकरण विभागाच्या वतीने शनिवारी शहर परिसरात ठिकठिकाणी दुरूस्तीची कामे हाती घेण्यात आली होती. महापालिकेची विविध जलशुध्दीकरण केंद्रे, बुस्टर पंपींग स्टेशन येथे स्मार्ट सिटी कंपनीच्या सहकार्याने कामे करण्यास सुरूवात झाली.

महापालिकेच्या विविध जलशुध्दीकरण केंद्रांमध्ये नवीन व्हॉल्व्ह आणि फ्लो मीटर बसविण्यासाठी विद्युत पुरवठा खंडित ठेवण्याची मागणी करण्यात आली. यासाठी शनिवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत विद्युत पुरवठा खंडित ठेवण्यात आला. दुरूस्ती कामातंर्गत जुना गंगापूर रोड येथील पंपींग स्टेशनचे काम रविवारी सकाळी साडेपाचपर्यंत पूर्ण करण्यात आले. परंतु, रविवारी सकाळी नऊ वाजता काही ठिकाणी जलवाहिनीला गळती लागल्याचे लक्षात आले. जलवाहिनीमधील एअर व्हाॅल्व्ह बंद होऊन मोठ्या प्रमाणात गळती होत राहिली. त्वरीत जलवाहिनीचे काम दुरूस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले. परंतु, त्याची व्याप्ती मोठी असल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. सोमवारी पुन्हा गंगापूर धरणातून पाणी उपसा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुपारी चार वाजता जलवाहिनीमधील पाण्याचा प्रवाह नियंत्रणात आणून काम सुरु केले. हे काम पूर्ण होण्यास रात्रीचे अकरा वाजले.

दरम्यान, महापालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्रांचा आढावा घेण्यात आला. गंगापूर येथील पंपीग बंद करण्यात आले असता पंचवटीतील निलगिरी बाग जलशुध्दीकरण केंद्रातील जलवाहिनीचा प्रवाह कमी झाल्याने सर्व अभियंत्यांना तपासणी करण्याविषयी सूचना देण्यात आल्या. सद्य: स्थितीत सर्व जलशुध्दीकरण केंद्रांवरुन पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला असून निलगिरी बाग जलशुध्दीकरण केंद्रातून काम पूर्ण करुन पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असा दावा महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे.

महापालिकेच्या तांत्रिक कामामुळे गंगापुर रोड, निलगिरी बाग परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून पावसाचे पाणी साठवित त्यावर तुरटी फिरवत घरगुती वापरासाठी त्याचा वापर केला. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर तसेच अन्य स्त्रोतावर अवलंबून रहावे लागले. पावसाळ्यातही टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.