नाशिक: सिंदूर मोहिमेच्या यशानंतर भारतीय सशस्त्र दलाच्या सन्मानार्थ राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे स्थानिक आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी शहरात तिरंगा फेरी काढण्यात आली. या फेरीपासून सत्ताधारी महायुतीतील भागीदार शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे पदाधिकारी दूर राहिले. हा देशाचा कार्यक्रम असून कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम नसल्याची सारवासारव महाजन यांना करावी लागली.

शनिवारी तिरंगा फेरीचे आयोजन करण्यात आले होते. पंचवटी कारंजापासून या तिरंगा फेरीला सुरुवात झाली.मालेगाव स्टँड- रविवार कारंजा-मेनरोड-धुमाळ पॉइंट-महात्मा गांधी रस्तामार्गे हुतात्मा स्मारक येथे समारोप झाला. तिरंगा फेरीत भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हिरे,माजीमंत्री डॉ.भारती पवार सहभागी झाले होते.मागील रविवारी शिंदे गटाने शहरातील विधानसभा मतदारसंघात आयोजित तिरंगा फेरी अपरिहार्य कारणाने रद्द केली होती.

राज्यात काही ठिकाणी शिंदे गटाच्या पुढाकारातून तिरंगा फेरी काढली गेली परंतु,अजित पवार गट मात्र कुठेही नसल्याच्या प्रश्नावर महाजन यांनी सगळीकडे आम्ही बरोबर असल्याचे नमूद केले. जळगावमध्येही आम्ही बरोबर होतो. तिरंगा फेरी हा संपूर्ण देशाचा कार्यक्रम आहे. कुठल्या पक्षाचा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पहलगाम हल्ल्यानंतर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. नंतर युद्ध का करीत नाही आणि केले तर का केले, असे प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केले गेले. विरोधकांचे काम टीका करणे असून ते ती करणारच, अशा शब्दांत महाजन यांनी विरोधकांना लक्ष्य केले. भारतीय जवानांना सलाम करण्यासाठी आणि पंतप्रधानांचे आभार मानण्यासाठी तिरंगा फेरीचे आयोजन करण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले.