नंदुरबार : देशातील बांधव विविध सण, उत्सवात मग्न असताना सीमेवर सैनिक मात्र चोवीस तास देशाच्या संरक्षणासाठी दक्ष असतात. सण, उत्सवांपासून सैनिकांना कायमच दूर राहावे लागते. देशाचे संरक्षण याकडेच त्यांचे लक्ष असते. सण, उत्सवात सैनिकांना आपल्या घरची आठवण येणे साहजिकच असते. घरातील मंडळींसमवेत सण साजरा करण्यात काही वेगळाच आनंद असला तरी हा आनंद सैनिकांच्या वाटेला कायमच येईल असे नसते. देशाच्या सीमेवर कार्यरत या सैनिकी भावांच्याप्रती देशप्रेमाच्या जाज्वल्य भावनेतून नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील कारेघाट येथील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी स्वखर्चातून ऱाख्या खरेदी करुन त्या सैनिकांना टपालाने पाठवल्या. सामाजिक भान ठेवत विद्यार्थिनींनी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतूक होत आहे.
नवापूर तालुक्यातील गुजरातच्या सीमावर्ती भागालगत असणाऱ्या कारेघाट येथे अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत परिसरातील आदिवासी पाड्यांमधून विद्यार्थी येतात. वसतिगृहात राहणारे हे विद्यार्थी त्यांना मिळणाऱ्या पैशातून स्वत:ची निकड भागवून काही पैसे जपून ठेवतात. या साठवणूक झालेल्या पैशांचा उपयोग करत विद्यार्थिनींनी समाजाप्रती एक आदर्श घालून दिला आहे. देशाच्या सीमेवर रात्रंदिवस पहारा देणाऱ्या सैनिकांप्रती आपल्या भावना पोहचवाव्यात या हेतूने, आश्रमशाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली, विद्यार्थिनींनी एकत्र येऊन आपल्या खर्चाच्या बचतीच्या पैशांतून राख्या विकत घेतल्या. या राख्या त्यांनी आकर्षक पध्दतीने सजवल्या. विद्यार्थिनींनी केवळ राख्याच नव्हे तर, सैनिकांना उद्देशून भावनापूर्ण पत्रेही लिहिली. या पत्रांमध्ये त्यांनी देशासाठी सीमेवर अहोरात्र जागणाऱ्या सैनिक बांधवांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. “आम्ही घरी सुरक्षित आहोत, कारण तुम्ही सीमेवर आहात. रक्षाबंधनासारख्या सणात तुम्ही घरी येऊ शकत नाही, म्हणून आम्ही तुम्हाला ही राखी पाठवत आहोत. ही राखी आमच्या प्रेमाचे आणि आदराचे प्रतीक आहे,” असे अनेक भावनापूर्ण संदेश या पत्रांमध्ये विद्यार्थिनींनी सैनिकांना लिहिले आहेत.
या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली आहे. तसेच, सामाजिक बांधिलकीचे महत्त्वही त्यांना समजले. एका लहानशा गावातल्या आदिवासी विद्यार्थ्यांकडून राबविण्यात आलेला हा उपक्रम नवापूर तालुक्यासह संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. सर्व स्तरांतून या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले जात आहे. अशा उपक्रमांमुळेच देशाची भावी पिढी अधिक संवेदनशील आणि जबाबदार बनण्यास मदत होईल, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.