नाशिक : मुंबई येथील स्पोर्टस एन्व्हायर्नमेंट ट्रस्टतर्फे आयोजित राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेत येथील वन्यजीव छायाचित्रकार प्रा. आनंद बोरा यांना प्रथम क्रमांकाचे राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त झाले. त्यांच्या रंगीत सरडय़ाच्या लढाईच्या छायाचित्राला हे बक्षीस मिळाले.
मुंबई येथील स्पोर्ट्स एनव्हायर्नमेंट ट्रस्टच्या वतीने ११वा ‘पृथ्वी मेळा २०२०’ हा राष्ट्रीय उपक्रम नुकताच वांद्रे येथे पार पडला. विविध राज्यातील पर्यावरण अभ्यासकांनी या परिषदेमध्ये सहभाग नोंदविला होता. विविध उपक्रम यानिमित्त घेण्यात आले. याअंतर्गत राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत देशातील १७५ छायाचित्रकारांनी सहभाग घेतला. दोन प्रवेशिका देशाबाहेरून देखील आल्या होत्या. या सर्व प्रवेशिकांमधून नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष आणि वन्यजीव छायाचित्रकार प्रा. आनंद बोरा यांना प्रथम पारितोषिक जाहीर झाले.