scorecardresearch

मालेगावच्या विकासासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध

२७ नगरसेवकांच्या पक्ष-प्रवेश सोहळय़ात अजित पवारांसह छगन भुजबळ यांची ग्वाही

(संग्रहित छायाचित्र)

२७ नगरसेवकांच्या पक्ष-प्रवेश सोहळय़ात अजित पवारांसह छगन भुजबळ यांची ग्वाही

नाशिक : मालेगावच्या विकासासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध असून पुढील निवडणुकीत महापौर हा राष्ट्रवादीचाच होईल, असा दावा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मालेगावच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन दिले.

मालेगावातील विविध पक्षांचे २८ नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उपमुख्यमंत्री पवार, जलसंपदामंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.  मुंबईतील राष्ट्रवादी भवनात मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, युवक अध्यक्ष मेहबूब शेख, माजी खासदार समीर भुजबळ, मालेगावचे शहराध्यक्ष आसिफ शेख, शिवाजी गर्जे, माजी आमदार शेख रशीद शेख, महापौर ताहेरा शेख, नाशिक जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार हेही उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मालेगावचा देखील नाशिकप्रमाणेच विकास होईल तसेच भुजबळ आणि आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा विस्तार देखील होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी यांनी ओळखपत्राचे वाटप केले. यावेळी मालेगाव मनपाचे माजी सभागृह नेता अन्सारी मोहम्मद अस्लम खलील अहमद, माजी स्थायी समिती सभापती जफर अहमद अहमदुल्लाह, विठ्ठल बर्वे आदी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp is committed for the development of malegaon says chhagan bhujbal zws

ताज्या बातम्या