महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या अटकेनंतर पक्षाध्यक्षांच्या सुचनेकडे दुर्लक्ष करत प्रारंभी रस्त्यावर उतरणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने तब्बल चार दिवसानंतर कारवाईच्या निषेधार्थ शुक्रवारी स्वतंत्र बैठकांचे सत्र राबविले. राष्ट्रवादी भवनमध्ये झालेल्या एका बैठकीत जेमतेम ३५ ते ४० पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सत्तेवर असताना कार्यकर्त्यांनी ओसंडून वाहणाऱ्या याच कार्यालयात बैठकीसाठी जमलेल्यांची संख्या पक्षाची स्थानिक पातळीवरील स्थिती अप्रत्यक्षपणे कथन करत आहे.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ अमेरिकेत गेले असताना अंमलबजावणी संचालनालयाने समीर यांना अटक केली. न्यायालयाने त्यांची रवानगी कोठडीत केली आहे. सत्ताधारी भाजप सूडबुद्धीने विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाई करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त करत पवार यांनी या मुद्दय़ावर आंदोलनाची गरज नसल्याचे म्हटले होते. पक्षाध्यक्षांनी ही सूचना केली असली, तरी नाशिक हा कधीकाळी भुजबळांचा बालेकिल्ला. त्यामुळे स्थानिक भुजबळ समर्थक कार्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत रास्ता रोको, बसगाडय़ांची तोडफोड, वाहनधारकांची अडवणूक असे सलग दोन दिवस आंदोलनाचे सत्र सुरू ठेवले. या घडामोडीनंतर राष्ट्रवादीने शुक्रवारी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्या वेगवेगळ्या बैठकांचे आयोजन केले होते. मुंबई नाकालगतच्या राष्ट्रवादी भवनमध्ये प्रदेश चिटणीस दिलीप खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मिळून जेमतेम ३५ ते ४० जण यावेळी उपस्थित होते.
काँग्रेस आघाडीच्या सत्ताकाळात खुद्द भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या या भव्यदिव्य कार्यालयाची संकल्पना प्रत्यक्षात आणली होती. या कार्यालयात बैठक वा तत्सम कोणत्याही कार्यक्रमावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठी गर्दी होत असे. राज्यात सत्ताबदल झाल्यापासून काहीसे सुनेसुने झालेले हे कार्यालय किमान या बैठकीच्या निमित्ताने फुलून येईल, अशी पदाधिकाऱ्यांची असणारी अपेक्षा फोल ठरल्याचे दिसले. भुजबळांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखली जाणारी मंडळी आधिक्याने उपस्थित होती. अनेक नगरसेवक व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बैठकीकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. समीर भुजबळ यांना झालेली अटक आणि एकूणच भुजबळ कुटुंबीयांना शासकीय यंत्रणेमार्फत राजकीय सूडबुद्धीने दिला जाणारा त्रास याबद्दल बैठकीत निषेध करण्यात आला. पुढील काळात सत्ताधारी याच पद्धतीने भुजबळ कुटुंबीयांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करणार असल्यास त्यांच्या कारवाईला नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेस जशास तसे उत्तर देईल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. सत्ताधाऱ्यांनी आपले अपयश झाकण्यासाठी खचलेल्या मानसिकतेतून हे सगळे प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला. निषेध नोंदविताना एकाही पदाधिकाऱ्याने सत्ताधारी भाजपचा नामोल्लेख करणे टाळले, हे विशेष.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp meeting after sameer bhujbal arrest
First published on: 06-02-2016 at 01:35 IST