नाशिक – आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर, राष्ट्रवादीच्या (शरद पवार) वतीने रविवारी येथे राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराच्या दिवशी ‘देवा तूच सांग’ या जाहिरातीतून सत्ताधारी महायुती सरकारला लक्ष्य करण्यात आले. विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ या संत तुकोबारायांच्या ओळीचा संदर्भ देत शरद पवार गटाने राज्यात भेदभाव करून वाद वाढविण्याऐवजी मुद्याच बोला… असे सत्ताधाऱ्यांना सुनावले आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शिबिराला पंचवटीतील स्वामी नारायण कार्यालयात रविवारी सुरुवात झाली. यासाठी पक्षाचे प्रमुख शरद पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, सर्व खासदार, आमदार आणि प्रमुख नेते दाखल झाले आहेत. शिबिरात दिवसभरात विविध विषयांवर चर्चा होणार आहे. सायंकाळी शरद पवार हे पक्षाची वाटचाल आणि दिशा स्पष्ट करतील. रात्री ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचे तुकाराम विरूध्द नथुराम – हरी कीर्तन होणार आहे. सोमवारी गोल्फ क्लब मैदान येथून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर, पक्षाने स्थानिक दैनिकांमध्ये ‘देवा तूच सांग’ या ठळक अक्षरातील जाहिरातीतून विविध प्रश्नांकडे लक्ष वेधत हे स्वार्थी सरकार पुरस्कृत ग्रहण कधी सुटणार, असा प्रश्न केला आहे. जाहिरातीतून शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, पीक विमा, पिकाला हमीभाव, भावांतर योजना, युवांना नोकरी, लाडक्या बहिणींना २१०० रुपये, कापूस आयात, असुरक्षित महिला, कांदा निर्यातबंदी, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आदी प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. बळीराजाच्या हक्कासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.

मराठा आरक्षणाबाबत निर्णय झाल्यानंतर गणेशोत्सवात ‘देवाभाऊ…’ अशी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या जाहिरातीवर मित्रपक्षातील सत्ताधारी मंत्र्यांने कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोप मध्यंतरी आ. रोहित पवार यांनी केला होता. मराठा आरक्षणाच्या निर्णयाचे श्रेय दोन्ही पक्षांच्या नेत्यांना मिळू द्यायचे नाही असा हेतू होता का असा प्रश्न त्यांनी केला होता. या घटनाक्रमानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाने मेळावा आणि मोर्चाच्या पार्श्वभूमीवर, प्रसिद्ध केलेल्या ‘देवा तूच सांग’ जाहिरातीतून ‘देवाभाऊ…’ जाहिरातीला प्रत्युत्तर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.