जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढल्यानंतर बाह्यवळण मार्गाचे काम हाती घेण्यात आले. बहुप्रतीक्षित असा हा मार्ग एकदाचा वाहतुकीसाठी खुला झाल्याने विकासाला नवी दिशा मिळण्यासोबतच शहराचा उत्तरेकडे विस्तार होण्याचा मार्गही आता मोकळा झाला आहे. नवी मुंबईच्या धर्तीवर नवे जळगाव आता त्या दिशेला उभे राहण्याची चिन्हे दिसत असल्याने रिअल इस्टेट क्षेत्राचेही तिकडे लक्ष वेधले गेले आहे.
पाळधी ते तरसोद दरम्यानच्या बाह्यवळण महामार्गाचे एकूण १७.७० किलोमीटर लांबीचे काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारास २६ महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र, भूसंपादनासह इतर बऱ्याच कारणांमुळे बाह्यवळण मार्गाचे वेळेत काम पूर्ण होऊ शकले नाही. बराच आटापिटा केल्यानंतर आता कुठे बाह्यवळण महामार्गाचे काम मार्गी लागले आहे. गुणवत्तेसह वाहतूक चाचणी, कोटिंग, दिशादर्शक फलकांची उभारणी, सेवा रस्ते आणि विद्युतीकरण ही काही अंतिम टप्प्यातील कामे युद्ध पातळीवर पूर्ण केली जात आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पाळधीपासून तरसोदपर्यंत स्वतः गाडीने प्रवास करत या संपूर्ण मार्गाची नुकतीच पाहणी केली. त्यानंतर बाह्यवळण मार्गावरून एका बाजुने वाहतूक सुद्धा झाली.
सद्यःस्थिती लक्षात घेता जळगाव शहराचा पूर्व-पश्चिम तसेच दक्षिणेला मोठ्या प्रमाणात विस्तार झाल्याचे दिसून येते. त्यामुळे त्या भागात जमिनींचे दर गगनाला देखील भिडले आहेत. त्या तुलनेत पुरेशी दळणवळण सुविधा नसलेल्या उत्तर भागात विकासाला म्हणावी तशी चालना आतापर्यंत मिळाली नव्हती. मात्र, बाह्यवळण मार्गामुळे जळगाव शहराच्या उत्तरेला तीन ते चार किलोमीटरच्या अंतरात मालमत्ता विकासासह सेवा क्षेत्र, वाहतूक-पुरवठा व्यवस्था यांना चालना मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नागरी वस्त्यांसह शैक्षणिक संस्था, रूग्णालये, गोदामे यांच्यासाठी मुबलक जागा उपलब्ध झाल्याने शहराच्या वाहतूक व्यवस्थेवरील ताण आता हलका होऊ शकणार आहे. स्वच्छतेचा प्रश्नही बऱ्याचअंशी मार्गी लागणार आहे. सर्वात म्हणजे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात चांगली वाढ त्यामुळे होणार आहे.
जळगाव शहर हद्दवाढीला गती
शहर हद्दीबाहेर रहिवासी वस्त्यांसह शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, रुग्णालये आणि उद्योगांचे बरेच प्रस्थ वाढलेले असताना, २२ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या जळगाव महापालिकेकडून आतापर्यंत एकदाही हद्दवाढ करण्यात आलेली नाही. महापालिका प्रशासनाने हद्दवाढ करण्याची मानसिकता तयार केली असली, तरी निवडणुका झाल्यानंतरच त्यासाठी हालचाली सुरू होऊ शकणार आहेत. शहरालगतच्या कुसुंबा, रायपूर, असोदा, ममुराबाद, आव्हाणे, मोहाडी, मन्यारखेडा, बांभोरी आदी गावांपर्यंत हद्द वाढविण्याचा विचार महापालिकेकडून केला जाणार आहे. दरम्यान, हद्दवाढ करायची झाल्यास संबंधित ग्रामपंचायतींचे नाहरकत पत्रही प्रशासनाला घ्यावे लागणार आहे. त्यासाठी बराच वेळ द्यावा लागल्यास तातडीचा पर्याय म्हणून तूर्त बाह्यवळण महामार्गापर्यंतची हद्दवाढ महापालिका प्रशासन येत्या काळात करू शकते. त्यासाठी कोणत्या ग्रामपंचायतींची सुद्धा आडकाठी नसेल.
बाह्यवळण महामार्गामुळे केवळ वाहतुकीची नाही तर जळगाव शहराच्या आर्थिक विकासाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. उत्तरेकडे निर्माण होणारे नवे जळगाव विकसकांसह गुंतवणुकदारांना खुणावत आहे.आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, जळगाव)