पटसंख्या कायम राखण्याचे आव्हान

नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र वेगळे चित्र पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आणि काहीअंशी शहरी भागात जिल्हा परिषदेच्या माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांची नवीन प्रवेश मिळविताना अक्षरश: दमछाक होत आहे. शाळेतील पटसंख्या राखण्यासाठी दाखले आणि नवीन विद्यार्थी मिळविताना शिक्षकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

करोना महामारीमुळे अगोदरच शिक्षण क्षेत्राचे सर्वात जास्त नुकसान झाले असून पालक मुलांना शाळेत पाठविण्यास नकार देतांना दिसतात. सलग दुसऱ्या शैक्षणिक वर्षात ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. ऑनलाइन शिक्षणाला कं टाळून पालक आणि विद्यार्थ्यांकडून ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणाला नकार देण्यात येत आहे. याचा परिणाम पटसंख्येवर होत आहे. तुकडी वाचविण्यासाठी विद्यार्थी संख्येची अट असल्याने कोणत्याही परिस्थितीत शाळेचा पट राखण्यासाठी शाळेतील शिक्षकांची मे महिन्यापासूनच विद्यार्थी शोध मोहीम सुरू झाली. यासाठी शिक्षकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

विद्यार्थी मिळविणे म्हणजे गड जिंकल्यासारखे झाले आहे. मिळेल तिथून विद्यार्थी आणि दाखला आणणे, हेच शिक्षकांसाठी महत्वाचे काम झाले आहे.

जुन्या नियमाप्रमाणे शाळेत विद्यार्थी संख्या नियंत्रित झाली असली तरी काहीही झाले तरी शाळेत नवीन विद्यार्थी आणि दाखले आणावेत, अन्यथा परिणामास तयार राहावे, अशी तंबी शिक्षकांना दिली जात आहे. त्यामुळे शिक्षक जीवाचे रान करून नवीन विद्यार्थ्यांचा दाखला मिळेल तिकडे जाण्यास तयार होत आहेत. कधी या धावपळीत शिक्षकांचे अपघातही झाले आहेत. काही विद्यार्थ्यांनी शाळेचे तोंड न पाहता इयत्ता १० वी आणि १२ वीपर्यंत मजल मारली असून स्वत: चे नावही त्यांना लिहिता येत नाही अशी अवस्था आहे.

या सर्व गडबडीत शिक्षकांचे हाल होत आहेत. नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यास त्यांना तेवढाच दिलासा मिळतो. शासनाने जन्म दर लक्षात घेऊन शाळा, तुकडी, विद्यार्थी संख्या निश्चिात करावी, तसेच शाळांनी इमारतीसह इतर सुविधा दिल्यास विद्यार्थी आणि शिक्षकांसाठीही ते योग्य होईल, अशी मागणी करण्यात येत आहे.