नाशिक : करोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूच्या पाश्र्वभूमीवर तीन डिसेंबरपासून येथे सुरू होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनात पात्र गटातील ज्यांनी प्रतिबंधक लसीची एकही मात्रा घेतलेली नाही, त्यांना संमेलन स्थळी प्रवेश नाकारण्यात येणार आहे. म्हणजे केवळ लसीकरण झालेल्यांना संमेलनात सहभागी होता येईल. १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी मात्र हा निकष असणार नाही.

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्चमध्ये येथे होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डिसेंबपर्यंत पुढे ढकलावे लागले. संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात असताना करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचे सावट उभे ठाकले आहे. संमेलनात राज्यातील विविध भागासह देशभरातून साहित्यप्रेमी सहभागी होण्याचा अंदाज आहे. संमेलन स्थळी प्रतिबंधक लसीची एकही मात्रा घेतली नसल्यास प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी सांगितले. संमेलनात सहभागी होण्यासाठी किमान एक मात्रा घेतलेली असणे बंधनकारक  आहे. १८ वर्षांखालील वयोगटास लसीकरणाचा निकष राहणार नाही. विद्यार्थ्यांना संमेलनात सहभागी होता येईल, असे भुजबळ यांनी सांगितले.

प्रवेशद्वारावर प्रमाणपत्र पडताळणी, तापमापन

संमेलन स्थळ निरोगी राखण्यासाठी प्रवेशद्वारावर प्रतिबंधक लस घेतल्याचे प्रमाणपत्र तपासले जाणार आहे. तसेच प्रत्येकाचे तापमापन करण्यात येणार आहे. त्यात संशयित आढळलेल्या व्यक्तीची जलद प्रतिजन चाचणी केली जाईल. प्रवेशद्वारावर तापमापन झाल्यानंतर निरोगी व्यक्तीच्या बोटावर हिरव्या रंगाची तर आरोग्याशी संबंधित समस्या असणाऱ्या व्यक्तीच्या हातावर लाल रंगाची निशाणी केली जाणार आहे.