महापालिकेसह जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले असले तरी प्रचाराच्या रणधुमाळीत ‘नोटा’ या पर्यायाविषयी फारशी जनजागृती करण्यात न आल्याचे यावेळी दिसून आले.
महापालिकेच्या १२२ जागांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी नाशिककर मंगळवारी मतदान करतील. पालिकेची सत्ता आपल्याकडे यावी म्हणून पंधरवडय़ापासून राजकीय पक्षांकडून प्रचाराची राळ उडविण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपसाठी, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेसाठी, राज ठाकरे यांनी मनसेसाठी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेससाठी तर खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रमुख सभा घेतल्या.
याशिवाय इतर काही नेत्यांच्याही सभा झाल्या. सर्वच नेत्यांनी प्रचार सभांमधून आपल्या पक्षाची भूमिका मांडली. या निवडणुकीत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी गुंडांना मोठय़ा प्रमाणावर दिलेली उमेदवारी हा चर्चेचा विषय राहिला आहे. आपल्या पक्षाकडून गुंडांना उमेदवारी देण्यात आली नसल्याचा दावा शिवसेना आणि मनसेने केला असला तरी वास्तव तसे नाही. भाजपच्या नेत्यांनी तर गुंडांना पक्षात स्थान देण्याचे समर्थनच केले आहे.
याशिवाय केवळ उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षनिष्ठा, तत्त्व, नैतिकता वगैरे सर्व बाजूला सारत अनेक प्रस्थापित नगरसेवकांनी रात्रीतून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. राजकीय पक्षांनीही आपल्या पक्षातील निष्ठावंतांना आशेवर ठेवत ऐन वेळी पक्षात आलेल्या इतरांना उमेदवारी दिल्याचे प्रकार घडले. कोणत्याच पक्षाची उमेदवारी न मिळालेल्या अनेकांनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली.
राजकीय पक्षांनी उमेदवार देताना त्यांची सोय बघितली असली तरी त्यामुळे अनेक प्रभाग असे आहेत की त्या ठिकाणी कोणाला मत द्यावे, असा प्रश्न मतदारांना पडला आहे. काही प्रभागांमध्ये गुंड उमेदवार, गुंडांना उमेदवारी करणे शक्य नाही अशा ठिकाणी त्यांची पत्नी, मुलगी, मुलगा, भाऊ उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान सभ्यपणाचा बुरखा पांघरून फिरणाऱ्या या अशा उमेदवारांची खरी परिस्थिती त्या त्या परिसरातील नागरिकांना चांगलीच माहीत असल्याने अशा उमेदवारांना का मत द्यावे, असा त्यांचा प्रश्न आहे.
आपल्या प्रभागात एखादा उमेदवार मतदारांना योग्य वाटत नसल्यास त्यांना त्यासाठी ‘नोटा’ हा पर्याय देण्यात आलेला आहे.
मतपत्रिकेवर प्रभागातील प्रत्येक गटातील उमेदवारांच्या नावाच्या शेवटी ‘नोटा’ हा पर्याय असून त्यापुढील बटण दाबून आपणास एकही उमेदवार योग्य वाटत नसल्याचे मत नोंदविले जाऊ शकते. परंतु याबाबत जनजागृती न झाल्याने अपात्रतेच्या उमेदवारांनाही मते मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मतदान टक्केवारी वाढविण्याच्या जागृतीत ‘नोटा’कडे, मात्र दुर्लक्ष
‘नोटा’ या पर्यायासंदर्भात याआधी विधानसभा, लोकसभा निवडणुकीप्रसंगी निवडणूक आयोगाकडून चांगलीच जनजागृती करण्यात आली होती. त्यामुळे नोटासंदर्भात मतदारांना परिपूर्ण माहिती मिळाली होती. महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मात्र ‘नोटा’ या पर्यायाविषयी कोणतीच जनजागृती करण्यात आलेली दिसली नाही. शहरातील अनेक सामाजिक संघटनाही या संदर्भात गप्पच राहिल्या. त्यामुळे याबाबत उदासिनता असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी वेगवेगळ्या संस्था, संघटनांना हाताशी धरून जनजागृतीचा धडाका उडवून दिला. तशाचप्रकारे ‘नोटा’ या पर्यायासंदर्भातही अशी जनजागृती करण्याची गरज होती. तसे झाले असते तर मतदारांमध्ये जागृती होऊन आपण उभे केलेले किती उमेदवार पात्रतेचे नव्हते, याची जाणीव मतदारांनी राजकीय पक्षांना करून दिली असती, असे मत मतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.