धुळे- शहरातील गुन्हेगारी टोळीप्रमुख सत्तार मेंटल याच्यानंतर शहरातील कुख्यात गुन्हेगार शेख जावेद शेख मोहम्मद ऊर्फ जावेद नकटया (३७ ) याचे नावही चर्चेत आले आहे. संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक (एमपीडीए) कायद्यांतर्गत एक वर्षासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहात त्याला स्थानबद्ध करण्यात आले आहे. यामुळे शहरासह जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार धास्तावले आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आगामी निवडणुका, सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर समाजविघातक, धोकादायक आणि सराईत गुन्हेगारांविरुध्द ‘एमपीडीए’ अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांची यादी संबंधित अधिकाऱ्यांनी तयार केली आहे.
पोलिसांच्या दप्तरी हत्येचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, अपहरण, दंगा, गंभीर दुखापत, मादक पदार्थाची विक्री-वितरण तसेच दारूबंदी कायद्याचे उल्लंघन अशा गंभीर स्वरूपाच्या अनेक गुन्ह्यांची नोंद जावेद नकट्या याच्यावर आहे. सात वर्षांत धुळे शहर आणि चाळीसगावरोड पोलीस ठाण्यात जावेद नकट्यावर विविध गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखालील गुन्ह्यांचाही समावेश आहे.
धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील यांनी त्याच्याविरुध्द स्थानबद्धतेच्या (एमपीडीए) कारवाईचा प्रस्ताव तयार केला. शहर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक राजकुमार उपासे यांच्याकडे हा प्रस्ताव सादर झाल्यावर तो पुढे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्याकडे पाठविण्यात आला.
या प्रस्तावाची श्रीराम पवार यांनी कायदेशीर पडताळणी केल्यावर जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी जावेद नकटया याच्या ‘एमपीडीए’ कारवाईचा प्रस्ताव मंजूर करुन त्यास एक वर्ष स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानंतर जावेद नकट्या या गुन्हेगारास पोलिसांनी कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून नाशिक मध्यवर्ती कारागृहात दाखल केले.
शहरासह धुळे जिल्ह्यातील लहान मोठ्या वसाहतींमध्ये झोपडपट्टी दादा तयार झाले आहेत. अशा स्वयंघोषित ‘दादां’ कडून कोणत्या ना कोणत्या कारणाने नागरिकांना त्रास दिला जातो. उगाचच न्यायालय आणि पोलीस यांच्याकडे फेऱ्या मारणे आणि वाद वाढायला नको म्हणून अनेक जण अशा सराईत गुन्हेगारांच्या नादी लागत नाहीत. पोलिसांत तक्रार करायलाही घाबरतात. यामुळे ठिकठिकाणी दादागिरी वाढली आहे. या दादागिरीला वेसण घालण्याचे काम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे. त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेक्षण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांची साथ लाभत आहे.
जावेद नकट्याविरुद्ध झालेली ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, शहर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक राजकुमार उपासे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार,धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक पाटील आणि पथकातील पोलीस कर्मचारी हवालदार संतोष हिरे, कबीर शेख,हर्षल चौधरी व गौरव देवरे यांनी केली.
नागरिकांना भयमुक्त वातावरण उपलब्ध व्हावे, सण-उत्सव शांततेत साजरे व्हावेत आणि निवडणुका सुरळीत पार पडाव्यात, या उद्देशाने अशी कारवाई करण्यात येत आहे. – श्रीकांत धिवरे (जिल्हा पोलीस अधीक्षक,धुळे)