लोकसत्ता वार्ताहर
धुळे: दैनंदिन प्रशासकीय कामात कितीही व्यस्त असले तरी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याशी नागरिकांना सहज संपर्क साधता येणार आहे. अडल्या नडलेल्यांना गाऱ्हाणे आणि नव्या संकल्पनाही मांडता येणे शक्य होणार आहे. त्यासाठी त्यांनी आपला व्हाटस अप क्रमांक जाहीर केला आहे.
अभिनव गोयल यांनी अलिकडेच जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार हाती घेतला आहे. न्यायदंडाधिकारी म्हणून सामान्यांची गाऱ्हाणी आणि नव्या संकल्पना ऐकून घेणे ही जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांना निभवावी लागते.आपल्या भावना व्यक्त करणाऱ्यांची संख्या धुळ्यात अधिक असल्याचा अनुभव गोयल यांना थोड्याच दिवसात आला आहे. या धबगड्यातून सामान्य लोकांना प्रत्यक्ष भेटता येत नसले, तरी किमान त्यांच्या भावना जाणून घेणे आवश्यक आहे असे जिल्हाधिकारी गोयल यांना आवश्यक वाटले आहे. यामुळे त्यांनी ८७६७८३४५५३ या भ्रमणध्वनीवरील आपला व्हाट्सअप सामान्य जनतेसाठी उपलब्ध करून दिला आहे.
आणखी वाचा-नाशिक: तपासणी मोहिमेत फरार संशयित ताब्यात
आपण दौऱ्यावर किंवा बैठकीत असताना कुणाला भेटू शकलो नाही,तर आपले अर्ज किंवा निवेदने या क्रमांकावर व्हाट्सअप करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही तरी सामान्यांना आता जिल्हाधिकारी गोयल यांच्याशी शक्य त्यावेळी संपर्क साधता येऊ शकणार आहे.