जिल्ह्य़ात नव्याने सहा करोनाबाधित रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णांचा आकडा १३० पर्यंत पोहचला आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रातील १०, ग्रामीण भागातील चार, तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील ११६ रुग्णांचा समावेश आहे. नाशिक शहरात पाच दिवसांत नवीन बाधित रुग्ण आढळलेला नाही. याउलट स्थिती मालेगावमध्ये आहे.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्य़ात आतापर्यंत करोनाचे एकूण १३० रुग्ण आढळले. त्यातील मालेगावच्या ११ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचाराअंती दोन रुग्ण बरे झाले. तर मालेगावमधील १० रुग्णांचे पहिले अहवाल नकारात्मक आले. या भागातील एकाच कुटुंबातील सहा जणांना करोनाची लागण झाल्याचे उघड झाले.

नाशिक शहराच्या तुलनेत दाट लोकवस्तीच्या मालेगावमध्ये चिंताजनक स्थिती आहे. नाशिक शहरात करोनाचे पाच दिवसांत रुग्ण आढळलेले नाही. पण सर्दी, खोकला ताप अशी लक्षणे असणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशी लक्षणे आढळणाऱ्या संशयितांना महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल केले जात आहे.

बाधित रुग्ण ज्या भागात वास्तव्य करतात त्या गोविंदनगर, बजरंगवाडी, नाशिकरोड, संजीवनगर, नवश्या गणपती (गंगापूर रोड) हा परिसर ५०० मीटर ते तीन किलोमीटपर्यंतच्या परिघातील क्षेत्र बंदिस्त करण्यात आले.

शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रतिबंधित क्षेत्राचा कालावधी १४ दिवसांनी वाढविण्यात आला आहे. आधी या क्षेत्राचा कालावधी १४ दिवस होता. यामध्ये दुपटीने वाढ केली गेली. गोविंदनगरच्या बाधितास रुग्णालयातून सोडण्यात आले. नव्या मार्गदर्शक तत्वानुसार गोविंदनगरचे क्षेत्र १८ मेपर्यंत प्रतिबंधित क्षेत्रात समाविष्ट राहील.

शहरातील अन्य प्रतिबंधित क्षेत्रासाठी देखील पुढील काळात हा निकष लागणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. महापालिका क्षेत्रातील ४० जणांचे अहवाल प्रलंबित असून त्याकडे सर्वाचे लक्ष आहे.

नाशिकमध्ये मिठाई, फरसाण दुकानांवर निर्बंध

राज्य सरकारच्या सुचनेनुसार टाळेबंदीतील काही नियम शिथील केल्यानंतर नाशिकमध्ये मिठाई, फरसाण दुकानांसमोर गर्दी होऊ लागल्याने ही दुकाने बंद ठेवण्याचा आदेश अन्न आणि औषध प्रशासनाने दिला. टाळेबंदीत नागरिकांची होणारी गैरसोय पाहता वेगवेगळ्या उद्योगांना तसेच उत्पादकांना परवानग्या देण्यात आल्या आहेत. या काळात साठेबाजी होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. राज्य शासनाने केलेल्या सुचनांनुसार जिल्ह्यातील मिठाई उत्पादक, विक्रेते, फरसाण उत्पादक यांना उत्पादन करण्यास आणि फक्त पार्सल सेवा देण्यास परवानगी देण्यात आली होती. या विक्री काळात किंवा उत्पादनाच्या काळात सामाजिक अंतराचे भान ठेवावे, आरोग्य विभाग तसेच शासनाने केलेल्या सुचनांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले होते. परंतु, या ठिकाणी होणारी गर्दी पाहता अन्न आणि औषधचे सहआयुक्त चं. दौ. साळुंके यांनी उत्पादक तसेच विक्रेत्यांना दिलेल्या परवानग्या स्थगित केल्या असून सर्व मिठाई आणि फरसाण उत्पादक, विक्रेते यांना व्यवसाय त्वरीत बंद करण्याचा आदेश दिला आहे.