धुळे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रभाग रचनेवर नागरिकांकडून हरकतींचा अक्षरशः पाऊस पडला आहे. अंतिम दिवसापर्यंत ६०१ हरकती दाखल करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या हरकतींवर मंगळवारपासून सुनावणीला सुरुवात करण्यात आली असून ही प्रक्रिया २२ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

प्रत्येक प्रभागातील नागरिकांनी विविध मुद्द्यांवर आक्षेप नोंदवले आहेत. हरकतींवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे.  महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १९ प्रभागांची प्रारूप रचना चार सप्टेंबर रोजी जाहीर झाली होती. तेव्हापासून हरकती मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली.

हरकती नोंदविण्यासाठी १५ सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. सुरुवातीला हरकतींचा वेग मंदावला असला तरी, अंतिम दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले. हरकती स्वीकारण्यासाठी स्थापन कक्षात नियंत्रण अधिकारी मनिष शेंद्रे, डी. एन. पाटील, राजरत्न बागूल, हिमांशू भदाणे आणि समाधान सोनवणे यांचे पथक कार्यरत होते.

दिवसभर अर्ज दाखल करण्याची गर्दी सुरु होती. सायंकाळपर्यंत हरकती दाखल करण्यासाठी इच्छूक उमेदवारांसह नागरिकांचीही संख्या अधिक होती. दाखल झालेल्या हरकतींची छाननी रात्री उशिरापर्यंत करण्यात आली. या हरकतींवर मंगळवारपासून सुनावणी सुरु करण्यात आली. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी सुनावणीसाठी अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या सभागृहात या हरकतींवर  सुनावणीला सुरुवात झाली.

दाखल झालेल्या सर्व हरकर्तीवर २२ सप्टेंबरपर्यंत सुनावणी होणार आहे. या सुनावणीदरम्यान हरकती घेणार्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जात आहे. सुनावणीवेळी अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील, अतिरीक्त आयुक्त करुणा डहाळे, उपायुक्त हेमंत निकम, नगर रचनाकार महेंद्र परदेशी उपस्थित होते.