अखेरच्या दिवशी लक्षणीय वाढ; एकाच दिवसात १२२ हरकती

नाशिक : महापालिका प्रभाग रचनेविषयी हरकती दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अक्षरश: पाऊस पडला. एकाच दिवसात १२२ हरकती आल्याने एकूण हरकतींची संख्या २११ वर पोहोचली आहे. महापालिकेने हरकतींच्या पडताळणीसाठी चार पथकांची स्थापना केली आहे. हरकतींबाबत १६ फेब्रुवारीपर्यंत निवडणूक आयोगाला अहवाल सादर करण्यात येणार आहे. हरकती आणि सूचनांवरील सुनावणीची प्रक्रिया २३ फेब्रुवारीपासून होण्याची शक्यता आहे.

करोनाची तिसरी लाट आणि ओबीसी आरक्षणचा वाद यामुळे महापालिका निवडणुकीविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त केले जात असताना फेब्रुवारीच्या प्रारंभी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली होती. ओबीसी आरक्षणाबाबत काही स्पष्टता होईल या गृहीतकावर हद्दी, खुणा आणि प्रभाग रचना करण्यात आली. प्रभागनिहाय आरक्षण नंतर निश्चित होणार आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत ४४ प्रभाग आणि १३३ जागा राहणार असून त्यात ४३ प्रभाग त्रिसदस्यीय तर एक प्रभाग चारसदस्यीय असणार आहे. प्रारूप रचनेवर हरकती नोंदविण्यासाठीची मुदत सोमवारी संपुष्टात आली. त्यावर निवडणूक आयोगाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत सुनावणी होणार आहे. हरकती दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी एकूण १२२ हरकती दाखल झाल्या. आतापर्यंत दाखल झालेल्या हरकतींमध्ये प्रभागाची व्याप्ती, सीमारेषा नियमाप्रमाणे नसणे, एका भागाचे दोन प्रभागांत विभाजन आदींचा समावेश आहे. काही हरकतींमधून प्रारूप प्रभाग रचनेतील त्रुटी मांडल्या गेल्या आहेत.

हरकती अशा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनपाच्या माहितीनुसार मुख्यालयात १३१, नाशिक पूर्व आणि नाशिक पश्चिम विभागात प्रत्येकी दोन, पंचवटी विभागात १३, नाशिकरोडमध्ये १६, नवीन नाशिक २२, सातपूर विभागात २५ हरकतींचा समावेश आहे. महत्त्वाच्या हरकतींच्या पडताळणीचे काम चार पथकांमार्फत सुरू झाले आहे. हरकतीनिहाय प्रभागातील सीमारेषा आणि तत्सम बाबींची छाननी केली जात आहे. प्रत्यक्ष जागेवर पथक भेटी देत आहे. हरकतींची मुदत संपल्यानंतर दोन दिवसांत निवडणूक आयोगाला अहवाल सादर करावयाचा आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर काही दिवसांत  हरकतींवरील सुनावणीची प्रक्रिया सुरू होणार आहे.