दिवाळीनिमित्त १० दिवसांपासून बंद असलेले बाजार समितीचे कामकाज सोमवारपासून नियमित सुरू होताच कांदा उत्पादकांना काहीसा दिलासा मिळाला. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा दराने ७०० रुपयांनी उसळी घेत सरासरी दर क्विंटलला अडीच हजार रुपयांवर पोहोचले. दरात तेजी आल्याने चाळीत कांदा साठविणाऱ्या शेतकऱ्यांची आशा अखेरच्या टप्प्यात पल्लवीत झाली आहे.

हेही वाचा- नाशिक शहरात १५ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी

दिवाळीमुळे लासलगाव, मनमाडसह जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद होते. सोमवारपासून बाजार समित्यांचे कामकाज सुरू झाले. पहिल्या दिवशी लासलगाव बाजारात ११ हजार ८४६ क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यास किमान ८५१, कमाल ३१०१, सरासरी २४५० रुपये दर मिळाले. या बाजारात २१ ऑक्टोबर रोजी कांद्याला सरासरी १८६० रुपये दर मिळाले होते. पावसामुळे नव्या कांद्याचे आगमन लांबणीवर पडणार आहे. चाळीतील बराचसा कांदा निकृष्ठ झाल्यामुळे फारसा माल शिल्लक नाही. दिवाळीनंतर मागणी वाढली असताना तुलनेत माल कमी आहे. या स्थितीचा कांदा दरावर परिणाम झाल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा- नाशिक : दुरुस्ती कामामुळे ओझरहून विमानसेवा काही दिवस बंद

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढूनही दर क्विंटलमागे सरासरी ७०० रुपयांनी वाढले. २१ ऑक्टोबर रोजी या बाजार समितीत प्रथम दर्जाच्या उन्हाळ कांद्याला १३०० ते २१००, सरासरी १८०० रुपये तर, दुसऱ्या दर्जाच्या कांद्याला १००० ते १६००, सरासरी १५०० रुपये क्विंटल असे भाव होते. २२ ऑक्टोबरपासून दिवाळीनिमित्त बाजार समितीत लिलावाचे कामकाज बंद होते. १० दिवसानंतर लिलावाचे कामकाज सोमवारी सुरू झाले. २५६ ट्रॅक्टर इतकी प्रचंड आवक झाली. प्रथम दर्जाच्या उन्हाळ कांद्याला १८०० ते २८५०, सरासरी २५०० रुपये तर दोन नंबर कांद्याला १३०० ते २५००, सरासरी दोन हजार रुपये क्विंटल असा भाव मिळाला. १० दिवसांच्या खंडानंतर कांदा भावात ७०० रुपयांनी वाढ झाली. बाजार आवारात मक्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यास सरासरी २०२० रुपये क्विंटल भाव मिळाले. मका भाव मात्र सुट्टीनंतरही स्थिर राहिले.

हेही वाचा- नाशिक: येवला तालुक्यात पिसाळलेल्या श्वानाच्या चाव्याने सहा जण जखमी

धान्य, कडधान्यात तेजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनमाड बाजार समितीत धान्य आणि कडधान्य बाजारातही तेजी दिसून आली. मूग ७१४० रुपये, बाजरी २०४१ रुपये, चना ४३०० रुपये, गहू २४१० उडीद ५५०० तर सोयाबिनला सरासरी ४९३० रुपये क्विंटल असा भाव होता. १० दिवसाच्या खंडामुळे बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढून त्याचा बाजार भावावर परिणाम होईल अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र आवक वाढल्यानंतरही शेती मालाचे भाव वधारले आहेत.