नाशिक – सरकारच्या योजनेनुसार पुरवलेला १५८९. १७६ मेट्रिक टन कांदा सामान्य नागरिकांना उपलब्ध करून न देता परस्पर विक्री करून स्वत:चा तब्बल साडेपाच कोटी रुपयाचा फायदा करत नाफेडच्या नाशिक कार्यालयाची फसवणूक केल्याप्रकरणी द गोवा स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग आणि सप्लाय फेडरेशन विरोधात येथील मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २२ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला. या संदर्भात जयंत कारेकर यांनी तक्रार दिली.

गोवा फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक काशिनाथ नाईक असे संशयिताचे नाव असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. द गोवा स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग आणि सप्लाय फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक काशिनाथ नाईक यांनी नाशिक नाफेड कार्यालयाकडून जिल्ह्यातील फेडरेशन व वेगवेगळ्या एफपीसीकडून पुरवठा केलेल्या १५८९.१७६ मेट्रिक टन कांदा जो ३५ रुपये किलो दराचा होता , त्याचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा कांदा चढ्या दराने बाजारात विकून पाच कोटी ५६ लाखहून अधिकचा स्वत:चा फायदा करून नाफेडच्या योजनेप्रमाणे सामान्य जनतेस कांदा उपलब्ध करून न देता नाफेड कार्यालय व नागरिकांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, देशात कांद्याचे भाव उंचावल्यानंतर दर स्थिरीकरण योजनेत नाफेडने खरेदी केलेला कांदा कमी दरात सामान्य नागरिकांना उपलब्ध केला जातो. गोवा फेडरेशनने या योजनेनुसार मिळालेला कांदा सामान्यांना न देता चढ्या दराने बाजारात विकून आपले उखळ पांढरे करून घेतल्याचे तक्रारीवरून दिसत आहे.