मालेगाव – सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या निमित्ताने सर्वत्र साग्रसंगीत पार्ट्यांची धामधूम सुरु असताना आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे वेगळ्या पद्धतीने सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला. समितीतर्फे व्यसनमुक्ती विरोधात जनजागृतीसाठी व्यसनरुपी भस्मासुराच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. व्यसनमुक्तीसाठी सर्वच शासकीय यंत्रणांनी कणखर भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

काही वर्षांपासून मालेगावात ‘कुत्ता गोली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमली पदार्थ विक्रीची प्रकरणे वारंवार समोर येत आहेत. बंदी घातलेल्या गुटख्याचीही शहरात विक्री होत आहे. मध्यंतरी अमली पदार्थ उत्पादन करणारा कारखाना उद्ध्वस्त करणे, अमली पदार्थ माफिया ललित पाटीलला लाभलेला कथित राजकीय आश्रय, यामुळे नाशिक जिल्ह्याची पुरती बदनामी झाली. या सर्व पार्श्वभूमीवर, आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ जनजागृती म्हणून व्यसनाच्या भस्मासूररुपी पुतळ्याचे दहन करण्यात आले.

हेही वाचा – नाशिक जिल्ह्यातील वायनरींमध्ये पर्यटनाचा बहर, वाइनचा खप २० टक्क्यांनी वाढला

अमली पदार्थ आणि अवैध धंद्यांमध्ये गुंतलेल्या ललित पाटीलसारख्या सर्वच माफियांचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अवैध धंद्यात गुंतलेल्यांना राजाश्रय मिळता कामा नये, अन्न व औषध प्रशासन, दारुबंदी विभाग व पोलीस दलाने संयुक्त कारवाई करून अमली पदार्थ विक्रीला पायबंद घालावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

हेही वाचा – नाशिक : नववर्षात शेतकऱ्यांचे शेतीच्या बांधावर आंदोलन; कांदा, दूध बाजारात नेण्याऐवजी बांधावरून देण्याची तयारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्या मुलांनी कुठलेही व्यसन करू नये म्हणून पालकांनी सतर्क राहावे, असे आवाहनही करण्यात आले. प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांनी व्यसनांचे दुष्परिणाम दर्शविणाऱ्या घोषणांचे फलक हातात घेतले होते. याप्रसंगी रामदास बोरसे, निखिल पवार, देवा पाटील, भरत पाटील, जितेंद्र देसले आदी उपस्थित होते.