‘मैदानी खेळांची राजधानी’ अशी नाशिकची ओळख

जिल्ह्याने राज्याला तसेच देशाला उत्तम खेळाडू दिले आहेत.

नाशिक येथे खेलो इंडिया अ‍ॅथलेटिक्स केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी खेळाडूंचा सत्कार करताना पालकमंत्री छगन भुजबळ

खेलो इंडिया अ‍ॅथलेटिक्स केंद्राचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन

नाशिक : जिल्ह्याने राज्याला तसेच देशाला उत्तम खेळाडू दिले आहेत. त्यामुळे नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर वेळोवेळी अधोरेखित होत असून याचा नाशिककरांना सार्थ अभिमान आहे. नाशिकला ‘मैदानी खेळांची राजधानी’ म्हणून मिळणारी ओळख कौतुकास्पद असून हे केवळ खेळाडूंमुळे शक्य झाल्याचे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी केले.

विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित जिल्हास्तरीय खेलो इंडिया अ‍ॅथलेटिक्स केंद्राच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, आंतराष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक विजेंद्र सिंग, नाशिक जिमखान्याचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील बापू नाडकर्णी (क्रिकेट), कविता राऊत (अ‍ॅथलेटिक्स), दत्तु भोकनळ (रोईंग), किसन तडवी (अ‍ॅथलेटिक्स), मिताली गायकवाड (पॅरास्पोर्टस-धनुर्विद्या), माया सोनवणे (क्रिकेट), विदित गुजराथी (बुद्धिबळ), संजीवनी जाधव, मोनिका आथरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून आता अ‍ॅथलेटिक्स खेळात प्रसाद अहिरे, ताई बामणे, दुर्गा देवरे, पूनम सोनवणे आदी खेळाडुंनी नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर वेळोवेळी गाजविले आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे  भुजबळ यांनी सांगितले. यावेळी भुजबळ यांच्या हस्ते उपस्थित अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. खेळाडूंनी शक्ती आणि युक्ती यांचा योग्य समन्वय साधून कौशल्ये आत्मसात करावीत असे ते म्हणाले.

पाच केंद्रांची अद्याप प्रतिक्षा

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने खेलो इंडिया केंद्रांतर्गत राज्यातील जिल्हानिहाय एक अशा विविध खेळांची एकूण ३६ क्रीडा केंद्रे मंजूर केली आहेत. यात जिल्ह्यातून  अ‍ॅथलेटिक्स, ज्युदो, तलवारबाजी, खो-खो, मल्लखांब आणि धनुर्विद्या अशा एकूण सहा केंद्राचे प्रस्ताव सादर केले होते, यापैकी  अ‍ॅथलेटिक्स या क्रीडा प्रकाराला मे २१ मध्ये मान्यता प्राप्त झाली. त्यादृष्टीने या अ‍ॅथलेटिक्स केंद्राची अधिकृतरित्या सुरुवात झाली असून उर्वरित पाच क्रीडा प्रकारांच्या केंद्रांना लवकरच मिळून जिल्ह्यात ती केंद्रे सुरु होतील. जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंची निवड जिल्हास्तरीय समितीमार्फत करण्यात आली असून खेळाडू व प्रशिक्षक यांची खेलो इंडियाच्या संकेत स्थळावर नोंदणी करण्यात आली आहे. या केंद्रासाठी केंद्र शासनाकडून प्रथम वर्ष १० लाख रुपये आणि पुढील तीन वर्षी पाच लाख रुपये असा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री भुजबळ यांनी दिली.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Outdoor sports khelo india games ysh

Next Story
लेफ्टनंट जनरल नैन यांच्याकडून लष्करी केंद्रांचा आढावा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी