मालेगाव : गेल्या विधानसभा निवडणुकीत मालेगाव बाह्य मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाकडून दादा भुसे, शिवसेना ठाकरे गटाकडून अद्वय हिरे व अपक्ष बंडूकाका बच्छाव असा तिरंगी सामना रंगला होता. या निवडणुकीत एक लाखावर मताधिक्य घेत भुसे यांनी विरोधकांना धोबीपछाड दिला होता. सलग पाचव्यांदा जिंकणाऱ्या भुसे यांचा विजयाचा वारू कोणत्या परिस्थितीत रोखता आला असता, हे सांगताना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष पवन ठाकरे यांनी आता भुवया उंचावणारे विधान केले आहे. या निवडणुकीत अद्वय हिरे यांनी स्वतः निवडणूक न लढवता पाठिंबा दिला असता तर बंडूकाका बच्छाव हे आज आमदार झालेले दिसले असते, असा आशयाचा दावा ठाकरे यांनी केला आहे.

तालुक्यातील विराणे येथे साकारण्यात आलेल्या भगवान वीर एकलव्य महाराज स्मारकाचे अनावरण बारा बलुतेदार मंडळाचे अध्यक्ष बंडूकाका बच्छाव यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना पवन ठाकरे यांनी बच्छाव यांच्या नेतृत्वाचे आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले. तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वत:च्या पक्षापेक्षा प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार बच्छाव यांना विजयाची अधिक संधी होती, हे मान्य करणारे वक्तव्य त्यांनी केले. ‘आमचे नेते अद्वय हिरे व बंडूकाका बच्छाव हे विधानसभा निवडणुकीत एकत्र बसून गेले असते तर आजच्या कार्यक्रमात बच्छाव यांचा आमदार म्हणून आपण सन्मान केला असता’, असे ठाकरे बोलून गेले. त्यांचे हे विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाले आहे.

एकेकाळी बच्छाव हे भुसे यांचे खंदे समर्थक होते. या दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाल्यानंतर काही काळ बच्छाव हे सक्रिय राजकारणापासून अलिप्त राहिलेले दिसले. शिवसेना दुभंगल्यानंतर भुसे हे शिंदे गोटात गेले आणि बदललेल्या राजकीय परिस्थितीत अद्वय हिरे यांना भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना ठाकरे गटात जाण्याची पाळी आली. ठाकरे गटात प्रवेश झाला न् झाला तोच हिरे यांच्या मागे शुक्लकाष्ट लागले. जिल्हा बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी त्यांना नऊ महिने तुरुंगात राहावे लागले. योगायोगाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर हिरे यांना जामीन मंजूर झाला व ते तुरुंगातून बाहेर आले.

दरम्यानच्या काळात बच्छाव हे ठाकरे गटात सक्रिय झाले. विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठी मग हिरे व बच्छाव हे दोघे प्रबळ दावेदार बनले होते. त्यात अपेक्षेप्रमाणे हिरे यांनी बाजी मारली. नाराज झालेल्या बच्छाव यांनी अपक्ष दंड थोपटले. या तिरंगी सामन्यात भुसे यांनी दणदणीत विजय मिळवला. बच्छाव हे दुसऱ्या स्थानी राहिले तर हिरे हे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले होते. राजकीय पक्षाचे पाठबळ नसताना अपक्ष उमेदवारी करुनही बच्छाव यांनी चांगली लढत दिली आणि हिरे यांच्यापेक्षा जास्त मते घेतले. त्यामुळे ठाकरे गटाने उमेदवाराची निवड करताना चूक केल्याची प्रतिक्रिया त्यावेळी मतदार संघात व्यक्त झाली होती. तसेच ठाकरे गटाने बच्छाव यांना उमेदवारी दिली असती तर निकालाचे चित्र कदाचित वेगळे राहिले असते, असाही सूर तेव्हा व्यक्त केला गेला होता. ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षाने आता याच सुरात सूर मिसळल्याचे दिसत आहे. त्यावरून बच्छाव यांच्याशी जुळवून घेण्याचे प्रयत्न ठाकरे गटाकडून सुरू झाले की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.