नाशिक : देशात नाटय़ क्षेत्रात सर्वाधिक कलाकार हे महाराष्ट्र आणि त्यापाठोपाठ बंगालमधून पुढे आले असून या दोनही राज्यात नाटय़प्रेमी अधिक आहेत. सध्याच्या काळात चित्रपट आणि मालिका टीव्हीवर अधिक येत असल्या तरी नाटकाकडे अद्यापही मोठा कल आहे. नाशिककर कवी वि. वा. शिरवाडकर, प्रा. वसंत कानेटकर, नटश्रेष्ठ बाबुराव सावंत यांच्या नावाने नाटय़ पुरस्कार दिला जातोय याचा आनंद आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी
केले.
येथील अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिर सभागृहात नाटय़ पुरस्कार सोहळा पार पडला. पुरस्कार्थीना पालकमंत्री भुजबळ तसेच ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी भुजबळ यांनी डॉ. जब्बार पटेल, डॉ. मोहन आगाशे यांसारख्या ज्येष्ठ मंडळींनी नाटय़ आणि लेखन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याचे सांगितले. सध्याच्या काळात चित्रपट आणि मालिका टीव्हीवर अधिक येत असल्या तरी नाटकाकडे अद्यापही मोठा कल आहे.
मुंबईचा महापौर असताना वि. वा. शिरवाडकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता. त्या वेळी त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार एक महिन्याच्या आत आपण नाटय़गृहासाठी जागा उपलब्ध करून दिली होती, अशी आठवण या वेळी भुजबळ यांनी सांगितली.
डॉ. पटेल यांनी मनोगतात रंगभूमीत ताकद असून विचारांची जडणघडण यामधून होत असते, असे सांगितले. क्रांतीची ज्योत पेटेल अशी अपेक्षा व्यक्त करून चालत नाही. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, सध्याच्या काळात रंगभूमीवर वेगळे विचार मांडण्याची गरज आहे. माणुस नकारात्मक नसतो.
तो सकारात्मकता शोधत असतो, असे त्यांनी सांगितले. डॉ. आगाशे यांनी आपण आजवर तेंडुलकरांची नाटके केली. पुरस्कार मात्र कानेटकरांच्या नावाचा मिळत असल्याचा आनंद आहे, असे नमूद केले. लेखक संजय पवार यांनी आज लेखकांनी व्यक्त होण्याची गरज मांडली. कार्यक्रमास ज्येष्ठ रंगकर्मी गिरीश सहदेव, मराठी नाटय़ परिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, उपाध्यक्ष डॉ. अविनाश धर्माधिकारी, प्रमुख कार्यवाहक सुनील ढगे हेही उपस्थित होते.
पुरस्काराने सन्मानित मान्यवर
वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्काराने लेखक संजय पवार यांचा, प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्काराने अभिनेते तथा ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. मोहन आगाशे यांचा तर बाबुराव सावंत नाटय़कर्मी पुरस्काराने नाशिकचे ज्येष्ठ रंगकर्मी तथा दिग्दर्शक गिरीश सहदेव यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार, प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कारासाठी २१ हजार रुपये, सन्मानपत्र असे तर, बाबुराव सावंत नाटय़कर्मी पुरस्कारासाठी ११ हजार रुपये, सन्मानपत्र असे आहे. याशिवाय दत्ता भट स्मृती पुरस्कार अभिनयाबद्दल दीपक करंजीकर, शांता जोग स्मृती पुरस्कार अभिनयाबद्दल विद्या करंजीकर, प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार दिग्दर्शनासाठी प्रदीप पाटील, नेताजी तथा दादा भोईर स्मृती पुरस्कार लेखनासाठी दत्ता पाटील, वा. श्री. पुरोहित स्मृती पुरस्कार बाल रंगभूमीसाठी सुरेश गायधनी, जयंत वैशंपायन स्मृती पुरस्कार सांस्कृतिक पत्रकारितेसाठी धनंजय वाखारे, गिरीधर मोरे स्मृती पुरस्कार प्रकाशयोजनेसाठी विनोद राठोड, प्रा. रामदास बरकले स्मृती पुरस्कार लोककलावंतांसाठी जितेंद्र देवरे, शाहीर गजाभाऊ बेणी स्मृती पुरस्कार शाहिरीसाठी राजेंद्र जव्हेरी, विजय तिडके स्मृती पुरस्कार रंगकर्मी कार्यकर्तासाठी राजेंद्र तिडके यांना प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते नाशिकच्या सामाजिक क्षेत्रात अलौकिक कार्य करणारे चित्रकार नारायण चुंबळे, निवृत्ती चाफळकर, संजय गिते, नितीन वारे , माजी आमदार जयवंतराव जाधव यांना विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Play still fans remarks chhagan bhujbal natya parishad branch awards ceremony amy
First published on: 14-05-2022 at 00:10 IST