मालेगाव : वृद्ध महिलेला रस्त्यावर आपटून दुचाकीस्वाराने भरदिवसा सोनसाखळी खेचण्याचा प्रकार दहा दिवसांपूर्वी मालेगाव येथे घडला होता. या प्रकरणाचा तपास लावण्यात मालेगाव छावणी पोलिसांना यश आले आहे. कल्याणचे दोन चोर यात गुंतल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून त्यातील एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून चोरी झालेली सोनसाखळी आणि दुचाकी जप्त करण्यात आली.
२२ जुलै रोजी सकाळी मालेगाव येथील रहिवासी कुसुमबाई शिरापुरे (८०) या मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. पावणे नऊ वाजेच्या सुमारास लोढा भवन या उच्चभ्रू वस्तीतील रस्त्याने त्या घराकडे पायी जात असताना पाठीमागून आलेला दुचाकीस्वार त्यांच्या पुढे काही अंतर गेला. पुन्हा माघारी वळला. कुसुमबाई यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोनसाखळी खेचून तो लगेच पळाला. सोनसाखळी खेचण्याच्या प्रयत्नात चोरट्याने असा काही जोरात हिसका दिला की, कुसुमबाई चक्क रस्त्यावर आपटल्या. या घटनेत त्यांना मुका मार लागला.
हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला होता. त्याच्या आधारे छावणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक जाधव आणि उपनिरीक्षक सचिन चौधरी यांनी चोरांचा तपास लावण्यासाठी तातडीने चक्रे फिरवली. चोरट्याने हेल्मेट घातले होते. त्यामुळे त्याची ओळख पटणे तसे अवघड होते. मनमाड चौफुलीमार्गे चांदवड आणि पिंपळगाव टोलनाका ओलांडून चोरटा त्याच दुचाकीने नाशिकच्या दिशेने गेल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे आली.
त्यानुसार नाशिकच्या पोलिसांना कल्पना देण्यात आली. नंतर नाशिकच्या पाथर्डी भागात एके ठिकाणी दुचाकी उभी करून हा चोरटा आणि नाशिक येथे थांबलेला त्याचा साथीदार अन्य दुचाकीने आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोहोचले. आडगाव पोलीस दोघांच्या मागावर असताना त्याच दिवशी तेथे दुसऱ्या एका महिलेची सोनसाखळी खेचून त्यांनी पलायन केले.
पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केल्यावर भेदरलेल्या संशयितांची दुचाकी रस्त्यात घसरून पडली. तेव्हा एक जण पळाला, मात्र दुसऱ्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. अली हसन अफसर (२५) आणि कासिम अफसर इराणी (२५) अशी या चोरांची नावे असून ते दोघेही कल्याण येथील रहिवासी आहेत. आडगाव येथील घटनेप्रकरणी तेथील पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांच्या तावडीत सापडलेल्या अली हसन अफसर याला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. ती कोठडी संपल्यावर आता छावणी पोलिसांकडे त्याला वर्ग करण्यात आले आहे. पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कासिम इराणीने मालेगावातील महिलेची सोनसाखळी खेचली होती, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ही सोनसाखळी अली याच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आली आहे. तसेच संबंधित दुचाकी देखील जप्त करण्यात आली. फरार कासिमला लवकरच पकडण्यात येईल, असा विश्वास तपासी अधिकारी सचिन चौधरी यांनी व्यक्त केला आहे.