धुळे: चोरांचे वेगवेगळे छंद असतात. काही चोर फक्त दागिने चोरतात. काही चोरांची नजर केवळ पैशांवर असते. तर काही चोरांना वाहनांची आवड असते. दुचाकी, चारचाकी चोरण्याची त्यांना इतकी सवय लागते की, कोणत्याही शहरातून, ग्रामीण भागातून ते सहजपणे वाहन चोरु शकतात. अर्थात प्रत्येकवेळी त्यांना चोरी लपविता येईलच असे नाही. नंदुरबार जिल्ह्यात दुचाकी चोरणाऱ्या दोन अट्टल चोरांबाबतही हेच घडले. मोटारसायकली चोरण्याची आवड निर्माण झालेल्या या दोन चोरांना पोलिसांनी नऊ लाख २० हजार रुपये किमतीच्या १८ मोटार सायकलींसह ताब्यात घेतले. दोघांविरुद्ध निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात मोटारसायकली चोरीचे प्रमाण वाढल्यावर पोलिसांकडून गांभिर्याने या चोरीचा तपास सुरु करण्यात आला. आमोदे ते आगरपाडा रस्त्यावरील साक्री तालुक्यात असलेल्या जोगीदेव डोगंराजवळ अनिल भिल- पवार (रा. साळवे, ता.शिंदखेडा) आणि शांताराम मोरे (रा.वेहेरगाव, ता.साक्री) हे संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक पोहोचल्यावर दोघेही मोटार सायकलवर येतांना दिसले, त्यांचे नाव विचारून पोलिसांनी खात्री केल्यावर त्यांच्याकडील मोटार सायकलविषयी चौकशी करण्यात आली असता दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडील मोटार सायकल चोरीची असल्याची माहिती पोलिसांना असल्याने आणि यासंदर्भात निजामपूर पोलीस ठाण्यात नोंद झालेली असल्याने पोलिसांनी दोघांना अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले.

पोलीस ठाण्यात दोघांनी गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांचे साथीदार अजय कोळी, चोख्या उर्फ सावकार कोळी (दोन्ही रा.साळवे, ता.शिंदखेडा) आणि भुऱ्या पाटील यांच्याशी संगनमत करुन साक्री तालुका परीसर व जिल्ह्यातील अन्य ठिकाणाहून अनेक मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली. प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मयुर भामरे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई केली. पोलिसांनी दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता २५ ऑगष्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातून चोरीस गेलेल्या १८ मोटार सायकली पोलिसांनी दोघांकडून जप्त केल्या.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अपर अधीक्षक डॉ.अजय देवरे,साक्रीचे उपविभागीय पोलीस अधीकारी एस.आर.बांबळे व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधीकारी मयुर भामरे,प्रियदर्शनी थोरात,यशवंत भामरे, मधुकर सोमासे,चंद्रकांत गायकवाड,संजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.