नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील खडक्या येथील एका तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्याच्या तत्कालीन निरीक्षकासह एका उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. याआधी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आलेल्या या दोघांच्या निलंबनाचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी काढले आहेत.

हेही वाचा- सप्तश्रृंग गडावरील बोकडबळी प्रथेसंबधी जनहित याचिका; सोमवारी सुनावणी

भाजपा नेत्या चित्रा वाघ पीडितेच्या कुटुंबियांच्या भेटीला

मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याची पीडितेच्या वडिलांची तक्रार आहे. या प्रकरणी जे. जे. रुग्णालयात कुटूंबियांच्या मागणीनुसार पीडितेच्या मृतदेहाचे पुन्हा विच्छेदन देखील झाले असून न्याय वैद्यकीय अहवालाची प्रतिक्षा कायम आहे. दरम्यान, या प्रकरणात याआधी तत्कालीन पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकासह सहा पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी कुटूंबियांची भेट घेतल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली.

हेही वाचा- धुळ्यात पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर; पाण्यासाठी नगरसेवकाचे ‘शोले’ टाईप आंदोलन

अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची केवळ बदली करुन चालणार नाही तर त्यांचे निलंबन व्हावे, अशी मागणी त्यांनी केली होती. तसेच या प्रकरणात सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटनांनीही दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली होती. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे अहवाल सादर केला होता. त्यानुसार या संपूर्ण प्रकरणात हलगर्जीपणा दाखविल्या प्रकरणी तत्कालीन निरीक्षक गोकुळ औताडे आणि उपनिरीक्षक बी. के. महाजन यांना निलंबित करण्यात आले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक शेखर यांनी त्यास दुजोरा दिला आहे. चित्रा वाघ यांनीही या निलंबनासंदर्भात ट्वीट केले आहे.