महिला पोलिसांची मदत; रात्रीही सुरक्षित वातावरण
नाशिक : रात्रीच्या वेळी एकटय़ादुकटय़ा महिलेची छेड काढणाऱ्या, गैरवर्तन करणाऱ्या टवाळखोरांवर कारवाईसाठी शहर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी महिला पोलिसांचीही मदत घेण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत पंचवटी, रामकुंड परिसरात गैरवर्तन करणाऱ्या दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
देशासह राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रकार वाढत आहे. दिल्ली, हैदराबाद येथील घटनेत रात्रीच्या वेळी कामावरून घरी जाणाऱ्या आणि इतर कारणांनी घरी जाण्यास उशीर झालेल्या महिलांच्या एकटेपणा, कमकुवतपणाचा
फायदा संशयितांनी घेतल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर, शहरात महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे यांनी या विशेष मोहिमेची संकल्पना मांडली आहे.
महिलांना रात्री आणि इतरवेळी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी निर्भया पथक आधीपासून कार्यरत आहे. हे पथक गस्त घालून छेडछाड करणाऱ्यांवर कारवाई करते. आता प्रत्येक पोलीस ठाण्यातील महिला, पुरुष कर्मचाऱ्यांचे पथक आपापल्या हद्दीत कार्यप्रवण झाले आहे. हे पथक साध्या वेशात कार्यरत राहील. रात्रीच्या वेळी महिलांच्या एकटेपणाचा फायदा घेऊन त्यांच्याशी अश्लील हावभाव, गैरवर्तन करणाऱ्या टवाळखोरांचा शोध घेऊन पथक कारवाई करणार आहे.
साध्या वेशातील महिला पोलीस बस, रिक्षा थांबे यासारख्या ठिकाणी एकटय़ा फिरतील. तिथे कोणी छेडछाड किंवा गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्यास पथकातील पुरुष कर्मचारी संशयितावर लगेचच कारवाई करतील. पंचवटी पोलीस ठाण्यामार्फत महिला-पुरुष कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून पंचवटी कारंजा आणि रामकुंड परिसरात ही मोहीम राबविली गेली. त्यावेळी आशीष अग्रहरी (३०) याने पंचवटी कारंजा येथे साध्या वेशातील महिला पोलिसांना आणि अक्षी अमीर इस्माईल (४५) याने रामकुंड परिसरात साध्या वेशात उभ्या असलेल्या महिला पोलिसांना डोळ्याने हावभाव करून गैरवर्तन केले. पथकातील कर्मचाऱ्यांनी या घटनेचे चित्रण करून दोन्ही संशयितांना तातडीने ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
टवाळखोरांचे चित्रीकरण
पथकातील महिला पोलीस साध्या वेशात रात्रीच्या वेळी घरी जाण्यास उशीर झाल्याचा बहाणा करून रिक्षा, बसची वाट पाहत उभ्या राहतील. पथकातील पुरुष कर्मचारी हे महिला पोलिसांच्या आसपास कोणाच्या लक्षात येणार नाही असे थांबलेले असतील. महिलेच्या एकटेपणाचा फायदा घेऊन कोणी त्यांची छेड काढण्याचा प्रयत्न केल्यास आसपास थांबलेले पथकातील पोलीस या घटनेचे भ्रमणध्वनीत छायाचित्रण करतील. तसेच संशयिताला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून कायदेशीर कारवाई केली जाईल.