जळगाव : शहरात एका महाविद्यालयाच्या परिसरात सुरू असलेल्या कॅफे कॉलेज कट्टावर रामानंदनगर पोलिसांनी छापा टाकून त्या ठिकाणी गैरकृत्ये करणाऱ्या काही तरूणांसह तरूणींना गुरूवारी ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी कॅफे चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तर ताब्यातील तरूणांसह तरूणींना पालकांसमक्ष समज देऊन सोडून दिले.
पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना एका महाविद्यालयाच्या परिसरात सुरू असलेल्या कॅफेमध्ये काही तरूण-तरूणी गैरकृत्ये करत असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाला शहरातील त्या कॅफेची तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. तपासणी दरम्यान पोलिसांना रामानंदनगर ठाण्याच्या हद्दीत एका गाळ्यामध्ये सदरचा कॅफे सुरू असल्याचे आढळून आले. तरूण-तरूणींना गैरकृत्ये करण्यास मोकळीक देण्यासाठी कॅफेच्या आतमध्ये प्लायवूडचे कप्पे तयार करून पडदे लावलेले होते. आतमध्ये बसण्यासाठी छोटे सोफे देखील ठेवले होते.
रामानंदनगर पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी एकूण १४ तरूण आणि तरूणी कॅफेमध्ये गैरकृत्ये करताना आढळली. पोलिसांनी त्यांची चौकशी करून पालकांना बोलावले आणि त्यांना समज देऊन सोडून दिले. पोलिसांनी कॅफेची कसून तपासणी केली असता तिथे कॉफी तयार करण्यासाठी लागणारे कोणतेही कॉफी पावडर, साखर, गॅस इत्यादी साहित्य आढळून आले नाही. तसेच कॅफेसाठी आवश्यक असलेला परवानाही चालकाकडे नव्हता. यामुळे पोलिसांनी अनाधिकृत कॅफेच्या नावाखाली गैरकृत्यांसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल कॅफे चालक मुकेश वसंत चव्हाण (३०, रा. रोटवद, ता. जामनेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने यशस्वी केली. या कारवाईत उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांच्यासह हवालदार सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपुत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, पोलीस नाईक योगेश बारी, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, अतुल चौधरी, विनोद सुर्यवंशी, स्वाती पाटील आदींनी सहभाग घेतला. पुढील तपास जितेंद्र राठोड करत आहेत.