दीर्घ प्रतिक्षेनंतर शहर परिसरात रिमझिम स्वरूपात का होईना पावसाने शनिवारी सायंकाळी पाऊणतास हजेरी लावल्याने नाशिककरांना हायसे वाटले. नाशिक वगळता उत्तर महाराष्ट्रात मात्र शनिवारचा दिवस कोरडा गेला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील आठवडय़ात नाशिक परिसर वगळता जिल्ह्यातील काही भागात बऱ्यापैकी पाऊस झाला होता. शहर परिसर मात्र पावसाकडे डोळे लावून होता. शनिवारी सकाळपासून आभाळ भरून आले तरी पाऊस येईलच ही आशा नाशिककरांनी काही दिवसांच्या अनुभवावरून सोडून दिली होती. दररोज ढगाळ वातावरण राहात असूनही पाऊस येत नसल्याने शनिवारी बिनधास्तपणे बाहेर पडलेल्या नाशिककरांची सायंकाळी आलेल्या पावसाने तारांबळ उडवली. इगतपुरी तालुक्यातही सकाळपासून संततधार सुरू होती. घाटमाथ्यावरील घोटी, इगतपुरी, भावली, मानवेढे, काळुस्ते, वैतरणा, वाडीवऱ्हे, शिरसाठे, मुंढेगाव, कुशेगाव या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्र्यंबक परिसरातही पाऊस झाल्याने नाशिककर सुखावले. कारण, त्र्यंबकेश्वरच्या पावसावर नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील जलसाठा अवलंबून आहे. गंगापूर धरणात अवघे काही दिवस पुरेल इतपतच जलसाठा शिल्लक असताना पाऊस आल्याने प्रशासनालाही काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात शनिवार कोरडाच गेला.

 

 

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rainfall in nashik
First published on: 03-07-2016 at 02:07 IST