नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात परतीच्या पावसाचे झोडपणे सुरूच आहे. लाखो हेक्टरवरील पिकांना त्याचा फटका बसला असून दिवसागणिक त्यात भर पडत असल्याने शेतकरी हबकला आहे. रात्रभर पाऊस कायम राहिल्याने नद्या, नाले दुथडी भरून वाहात आहेत. द्राक्षासह अन्य पिकेही पाण्याखाली बुडाली आहेत. पांझण-रामगुळणा नदीला पूर आला आहे. तर मनमाड परिसरात नदीकाठालगतच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहे. दीड हजार नागरिकांचे स्थलांतर करावे लागले असून नांदगावमध्येही अनेक भागात पाणी शिरल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सततच्या पावसाने एकटय़ा नाशिकमध्ये सव्वा तीन लाख हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान झाले होते. धुळे, जळगाव आणि नंदुरबारमध्येही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. शुक्रवारी रात्री पुन्हा पावसाने जोर धरला. सलग आठ ते दहा तास तो कोसळत होता.

पावसाने मागील तीन दशकांचा विक्रम मोडीत निघाला. या तडाख्यातून मका, द्राक्ष, सोयाबीन, उशिराचा खरीप कांदा, भाजीपाला असे कोणतेही पीक बचावले नाही. परतीच्या पावसाचा सटाणा, मालेगाव, नांदगाव, निफाड, येवला, चांदवड, सिन्नर, देवळा, नाशिक आदी भागास सर्वाधिक फटका बसला.

प्राथमिक अंदाजानुसार नाशिकमध्ये १६१४ गावांमधील चार लाख ५२ हजार ९३१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. ही आकडेवारी आणखी वाढणार आहे. द्राक्ष बागांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी साचले आहे. विविध टप्प्यातील बागा डावणी, फुलधारणा अवस्थेत कुजणे, द्राक्षमण्यांना तडे जाणे वा घड गळून पडणे आदींना तोंड देत आहेत. पावसाने बहुतांश शेती अक्षरश: धुऊन काढली आहे. हरीतगृहांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.

मनमाड शहर, परिसरात पांझण-रामगुळणा नदीला महापूर आला. नदीकाठावरील ४०० घरांमध्ये पाणी शिरले. दीड हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. पुरात दुचाकी, अ‍ॅपे, टपऱ्या, चारचाकी वाहने नदीच्या कडेला जाऊन अडकली. शुक्रवारी रात्री पाच तासात १३५ मिलीमीटर इतका उच्चांकी पाऊस झाला. इतर भागात पावसाचे प्रमाण कमी-अधिक प्रमाणात असेच होते.

धुळे, जळगाव जिल्ह्य़ात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. धुळे जिल्ह्य़ात पालकमंत्री दादा भुसे तर जळगावमध्ये गिरीश महाजन यांनी नुकसानग्रस्त भागात दौरा करून पाहणी केली. पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनाला अहवाल सादर करा, असे निर्देश उभयतांनी दिले. पावसामुळे जळगावमधील हतनूर, गिरणा, वाघूर हे तीनही मोठे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. त्यामध्ये ३६.१७ टीएमसी जलसाठा झाला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rainfall rains in northern maharashtra abn
First published on: 03-11-2019 at 01:09 IST