इगतपुरी, त्र्यंबकेश्वर येथील डोंगररांगा पर्यटक आणि अभ्यासकांसाठी पर्वणी

पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात यंदा मुक्तहस्ते कोसळलेल्या पावसामुळे सह्याद्रीच्या डोंगररांगा हिरवाईने नटल्या आहेत. रानफुलांचा ताटवा डोंगर पठारांवर फुलल्याने पर्यटक तसेच वनस्पतीशास्त्र अभ्यासकांसाठी ही पर्वणी ठरली आहे.

दुर्मीळ होत असलेल्या औषधी वनस्पतीही दिसू लागल्या आहेत. रानोमाळ भटकंती करताना रानफुले, वनस्पतींच्या मनमोहक सुगंधाने निसर्गप्रेमी हरखून जात असून निसर्गाचा हा खजिना डोळ्यात साठविण्यासाठी विविध भागातील अभ्यासक आणि पर्यटकांची गर्दी होत आहे

गड-किल्ल्यांची ऐतिहासिक पाश्र्वभूमी असलेला इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील निसर्गरम्य परिसर सर्वश्रृत आहे. सह्य़ाद्री पर्वतरांगेत विविध प्रकारच्या दुर्मीळ प्रजाती नेहमीच दिसून येतात. परंतु पाच-सहा वर्षांपासून या भागातही पर्जन्यमानाच्या प्रमाणात असमतोल झाल्याने काही वनस्पती आणि दुर्मीळ औषधी झाडेझुडुपे लुप्त होत चालली असताना यंदा समाधानकारक पावसामुळे रानफुलांसह औषधी वनस्पतींचा जणू काही खजिनाच निसर्गाने सर्वापुढे ठेवला आहे.

यावर्षी या दोन्ही तालुक्यांमध्ये गावठी वनस्पती आणि वनऔषधीमध्ये तिरडा, हिरडा, बेहडा, बेल, फालगम, अजनी, भुरणी दिसून येत आहेत.फुलांमध्ये ‘लॅमिअ‍ॅसी’ कुळातील रानतूळसही येथे पहायला मिळते. तसेच ‘लिलीअ‍ॅसी’ आणि ‘अस्कलेपिडॅसी’ कुळातील ‘ग्लोरिअसा सिरोपेजिया’, ‘बार्बाटस’, ‘कोमेलिना’, ‘सुपर्बा’ या फुलझाडांचेही दर्शन होत असल्याने निसर्गप्रेमींची पावले आवर्जून या भागाकडे पडत आहेत.

इगतपुरी, त्र्यंबक या तालुक्यांवर निसर्गाने मनसोक्त उधळण केली आहे. कास पठाराप्रमाणेच विविध प्रकारची रानफुले येथील सह्य़ाद्रीच्या डोंगररांगांच्या सौंदर्यात भर घालत आहेत. त्यात देव तेरडा, जंगली लॅव्हेंडर, गोकर्णा, पिवळी विळवण, मेनमूळ, हिरेशिर, कानवेल, सागकी, वासुकी, अम्बुशी, केना, पानवेल, देव केवडा, तिलोनी, हमाना, रानझेनिया, सोनकी आदी रानफुलांचा समावेश आहे. केंद्र शासनाने नव्याने तयार केलेल्या आयुष आणि पर्यटन विभागाने इगतपुरी, त्र्यंबकमधील दुर्मीळ वनस्पती, वनौषधी आणि रानफुले जतन करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.