नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी मालेगावात सभा होत असतानाच दुसरीकडे तत्पुर्वीच जिल्ह्यातील महिला आघाडीच्या काही पदाधिकारी व माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश घडवत शिंदे गटाने सभेद्वारे होणाऱ्या शक्ती प्रदर्शनाला शह देण्याचा प्रयत्न केला. महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख, माजी नगरसेविका, माजी नगरसेवक आदींनी रविवारी ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गेल्यानंतर राज्यात विभागवार जाहीर सभा घेण्यासाठी निघालेले उद्धव ठाकरे यांच्या कोकणातील खेड येथील पहिल्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. खेडपेक्षाही मालेगावची सभा जोरात करण्याच्या दृष्टीने ठाकरे गटाचे प्रयत्न आहेत. राज्याचे खनिकर्ममंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघात ही सभा होत आहे. याद्वारे ठाकरे गटाने शक्ती प्रदर्शनाची जय्यत तयारी करीत भुसेंची कोंडी करण्याचे धोरण आखले असताना त्यास प्रत्युत्तर देण्याची धडपड शिंदे गटाने केली. यापूर्वी शिवसेनेचे खा. संजय राऊत यांच्या नाशिक दौऱ्यावेळी शिंदे गटाकडून शिंदे गटात पक्षात प्रवेश घडवले जात होते. ठाकरे यांच्या सभेच्या दिवशी त्याची पुनरावृत्ती झाली.
रविवारी ठाकरे यांच्या सभेच्या आधीच ठाण्यातील आनंद आश्रम येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शोभा मगर, मंगला भास्कर, शोभा गटकळ, माजी नगरसेविका ॲड. श्यामला दीक्षित, माजी नगरसेवक उत्तम दोंदे, प्रभाकर पाळदे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती तथा उपमहानगरप्रमुख शशिकांत कोठुळे, उपमहानगरप्रमुख शरद देवरे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. जोडीला माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १६ सरपंच, पंचायत समिती सभापती, राष्ट्रवादी पदाधिकारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी पालकमंत्री दादा भुसे, प्रदेश समन्वयक नरेश म्हस्के, सहसंपर्कप्रमुख राजू लवटे, खा. हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आदी उपस्थित होते.
राज्यात युती सरकार अस्तित्वात आल्यापासून सर्वसामान्य माणसाला प्रमाण मानून अनेक निर्णय घेण्यात आले. शेतकरी, कष्टकरी,कामगार,महिला, विद्यार्थी या सगळ्यांना न्याय देणारे निर्णय घेण्यात आले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात देखील याचेच प्रतिबिंब पहायला मिळाले. तसेच समाजातील वेगवेगळ्या घटकाना न्याय देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे हे सरकार असून त्यामुळेच अनेक लोक शिवसेनेत सामील होत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच नाशिक जिल्ह्यातील हे सर्व पदाधिकारी असून या जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न देखील सरकारच्या माध्यमातून नक्की सोडवण्यात येतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.