नाशिक – आठवडाभरापूर्वी पंचवटीतील औरंगाबाद महामार्गावरील कैलासनगर (मिरची हॉटेल) चौफुलीवर झालेल्या खासगी प्रवासी बस आणि मालवाहू वाहन (डंपर) अपघातात १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या बसला ३० प्रवासी क्षमतेची परवानगी असताना त्यात ५५ प्रवासी होते. खासगी प्रवासी वाहतुकीत नियमांचे खुलेआम उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शासकीय यंत्रणांना जाग आली आहे.

हेही वाचा >>> वॉटरग्रेसच्या सफाई कर्मचाऱ्यांना ठेकेदाराकडून मारहाण – कैलास मुदलियारसह पाच जणांविरुध्द गुन्हा

प्रादेशिक परिवहन आणि पोलीस यांनी सहा ठिकाणी धडक मोहीम राबवत ११७ खासगी प्रवासी बसची तपासणी केली. त्यापैकी ३१ बसवर कारवाई करीत ७७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच एक बस आरटीओ कार्यालयात जमा करण्यात आली आहे. आठ ऑक्टोबर रोजी पहाटे कैलासनगर चौफुलीवर झालेल्या अपघातानंतर पोलिसांनी तातडीने खासगी प्रवासी वाहन मालक, व्यवस्थापक यांची बैठक घेतली होती. बेकायदेशीर वाहतूक केल्यास कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिला होता.

हेही वाचा >>> “त्या ज्येष्ठ नेत्याने पोलीस ठाण्यासमोर झोपणे अयोग्यच”, पालकमंत्री गुलाबराव पाटील स्पष्टच म्हणाले..

बैठकीत पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाकडून खासगी प्रवासी बसची तपासणी मोहीम सुरू करण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार उभयतांनी धडक मोहीम सुरू केली आहे. शहरात दिंडोरी जकात नाका, पेठ रस्त्यावरील जकातनाका, शिलापूर टोलनाका, शिंदे पळसे टोलनाका, मुंबई-आग्रा महामार्गावर नववा मैल, गौळाणे फाटा या सहा ठिकाणी पोलीस व आरटीओच्या पथकांनी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसची तपासणी सुरू केली. पहिल्याच दिवशी ११७ खासगी बसची तपासणी करण्यात आली. त्यातील ३१ बसमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले. या बसवर कारवाई करीत ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर एक खासगी बस प्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा करण्यात आली. खासगी बस मालक, व्यवस्थापकांनी नियमबाह्य प्रवासी वाहतूक करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.