बेमुदत संपात साडेपाच हजार कामगार सहभागी; प्रवेशद्वारासमोर ठिय्या
तीन वर्षांपासून प्रलंबित वेतन कराराची बोलणी लवकर पूर्ण करावी, अधिकारी वर्गाप्रमाणे कामगारांना हक्काची रास्त वेतनवाढ द्यावी, या मागणीसाठी ऑल इंडिया एचएएल समन्वय समितीने पुकारलेल्या बेमुदत संपाच्या पहिल्याच दिवशी ओझरस्थित हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कारखान्यातील कामकाज पूर्णत: विस्कळीत झाले. या ठिकाणी सुखोई लढाऊ विमानांची बांधणी होते. हे काम संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. साडेतीन हजार कायमस्वरुपी कामगारांनी संपात सहभाग नोंदवत प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. कंत्राटी कामगारांना कारखान्यात जाण्यास प्रतिबंध केला. भजन-कीर्तनातून व्यवस्थापनाच्या कार्यपध्दतीवर ताशेरे ओढले. अधिकारी वर्ग कामास उपस्थित राहिले, परंतु कामगार नसल्याने सुखोई बांधणी वा तत्सम कामे ठप्प झाली आहेत.
देशातील एचएएलच्या नऊ कारखान्यातील तब्बल २० हजार कर्मचारी वेतनवाढीसाठी कित्येक महिन्यांपासून आंदोलने करत आहेत. बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिल्यानंतर व्यवस्थापनाने वेतन कराराची बैठक आयोजित केली. परंतु, सन्मानजनक प्रस्ताव येईपर्यंत संघटना आणि समन्वय समिती बेमुदत संपाच्या आंदोलनावर ठाम आहे. ओझरस्थित एचएएलमध्ये कायमस्वरुपी साडेतीन हजार, तर कंत्राटी दोन हजार असे सुमारे साडेपाच हजार कामगार काम करतात. सकाळ सत्रात प्रवेशद्वारावर जमलेल्या हजारो कामगारांनी वेतनवाढीच्या मुद्यावर घोषणाबाजी करत प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर ठिय्या दिला. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर कारखान्यासमोर उड्डाणपूल आहे. यामुळे स्थानिक वाहतूक वगळता महामार्गावरील वाहतुकीला आंदोलनाची फारशी झळ बसली नाही. संपास व्यवस्थापनाकडून कामगारांना दिली जाणारी सापत्न वागणूक कारणीभूत ठरल्याचे कामगार संघटनेचे अध्यक्ष बी. व्ही. शेळके, सरचिटणीस सचिन ढोमसे यांनी म्हटले आहे. पुरेसे काम नसल्याचे कारण देऊन कामगार वर्गास लक्ष्य केले जात आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता आठ कामगारांची बंगळुरूच्या हवाई तळावर बदली केली गेली. एकिकडे आऊटसोर्सिग करायचे अन् दुसरीकडे ओव्हरऑल विभागात अतिरिक्त काम बंद करायचे. यामुळे काम नसल्याचे कारण न पटणारे असल्याचे त्यांनी सांगितले. भजन-कीर्तनातून कामगारांनी व्यवस्थापनाच्या कार्यपध्दतीवर बोट ठेवले. अधिकारी वर्ग नेहमीप्रमाणे कामावर उपस्थित झाले. परंतु, कामगार नसल्याने कारखान्यात कोणतेही काम झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. संपकऱ्यांनी कंत्राटी कामगारांना प्रवेशद्वाराबाहेर रोखून धरले. सकारात्मक निर्णय होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार शेळके यांच्यासह प्रवीण तिदमे यांनी नमूद केले.
संपात ‘राजकारण’
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना राजकीय पक्ष देखील या आंदोलनाकडे दुर्लक्ष करू शकले नाही. नाशिक मध्य मतदारसंघातील मनसेचे उमेदवार नितीन भोसले यांनी आंदोलकाची भेट घेत कामगारांचे प्रश्न जाणून घेतले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेवरून भोसले यांनी ही भेट घेतल्याचे प्रवीण तिदमे यांनी सांगितले. दिंडोरीच्या खासदार
डॉ. भारती पवार, निफाड मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अनिल कदम यांनी कामगारांची भेट घेतली. सध्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर हा प्रश्न संबंधित मंत्रालयासमोर मांडला जाईल, असे आश्वासन पवार यांनी दिल्याचे कामगारांकडून सांगण्यात आले.
कामांसाठी पाठपुरावा नाही
नाशिक विभागात एलसीए मार्क ए ची बांधणी सुरू करण्याचे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी दिले होते. परंतु, व्यवस्थापनाने त्याचा पाठपुरावा केला नाही. एलसीएशी निगडीत सुटे भाग आऊटसोर्स करण्यात आले आहेत. ते बंद करून हे काम नाशिक विभागाला द्यावे, अशी मागणी कामगार संघटनेने केली आहे.
