करोना संसर्गापासून बचावासाठी सॅनिटायझरने संपूर्ण घर निर्जंतूक केल्यानंतर रात्री पेटविलेल्या मेणबत्तीमुळे आगीचा भडका उडाला. त्यामुळे गंभीर भाजलेल्या महिलेचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरातील वडाळा भागातील मेहबूब नगरात ही घटना घडली.

आजकाल सर्वत्र सॅनिटायझरचा वापर वाढला असून योग्य दक्षता न घेता सॅनिटायझरचा अतीवापर केल्यास ते जिवावरही बेतू शकते. मेहबूब नगरातील गरीब नवाज मशिदीच्या शेजारी असलेल्या एका चाळीत शेख कुटूंबिय राहतात. रजबिया (२४) ही पती शाहीद आणि अक्सा, महेजबीन या मुलींसोबत राहत होती.

करोनाचा उद्रेक मोठय़ा प्रमाणावर असलेल्या वडाळा परिसरात तीन महिन्यांपासून मोठय़ा प्रमाणावर रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणूने परिसरातील नागरिक सातत्याने घराचे निर्जंतुकीकरण करून घेत आहेत. रजबिया यांनीही २० जुलै रोजी घरात फवारणी करून घेतली.

रात्री विद्युत पुरवठा खंडित झाला म्हणून त्यांनी मेणबत्ती पेटवताच आगीचा भडका उडाला. या भडक्याने रजबिया यांच्या अंगावरील कपडय़ांनी पेट घेतला. त्या जोरजोरात ओरडतच घराबाहेर पडल्या.

पती शाहीद आणि आजूबाजूच्या महिलांनी धाव घेत त्यांच्या कपडय़ांची आग विझवली. रजबिया या गंभीर भाजल्याने त्यांना तत्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतांना शुक्रवारी रात्री त्यांचे निधन झाले. मृत्यूनंतर हा सर्व घटनाक्रम उघड झाला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

करोनापासून बचाव होण्यासाठी सॅनिटायझरचा सुरक्षित वापर होणे आवश्यक आहे. हातावर सॅनिटायझरचे थेंब टाकल्यानंतर ते १० मिनिटे वाळल्यानंतरच पुढील कामांना सुरूवात करावी. सॅनिटायझरमध्ये ८० टक्के अल्कोहोल असल्याने ते ज्वलनशील पदार्थाच्या संपर्कात आल्यावर लगेच पेट घेते. घरातही अशा पध्दतीने फवारणी करण्यात येते. परंतु, तो संपूर्ण परिसर कोरडा होण्यास दीड तास लागतो. घरात फवारणी करतांना या सर्व बाबींचा विचार करावा

– डॉ. एस. आर. येरमाळकर