भंगार व्यवसायही अडचणीत

नाशिक : राज्यात मागील वर्षी करोनामुळे लागू झालेली टाळेबंदी आणि या वर्षी कडक निर्बंध यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रावर परिणाम झाला आहे. एक वर्षांहून अधिक कालावधीपासून ठिय्या दिलेल्या करोना संसर्गाचा परिणाम आता दुर्लक्षित अशा रद्दी आणि भंगार व्यवसायावरही झालेला पाहायला मिळत आहे. भंगार बाजारात एरवी कमी भावात विकल्या जाणाऱ्या रद्दीचा दर सध्या किलोमागे दोन आकडय़ात गेला असला तरी दिवसभर फिरूनही बाजारात रद्दी मिळत नसल्याने विक्रेते त्रस्त आहेत.

करोनाच्या पहिल्या टप्पात राज्य शासनाने निर्बंध लागू करून ते टप्प्याटप्प्याने वाढवत नेले. या कालावधीत शाळा, महाविद्यालये बंद राहिली. परीक्षा न घेता विद्यार्थी पुढील वर्गात प्रवेशित झाले. मागील वर्षी जूनमध्ये नव्या शैक्षणिक वर्षांचा आरंभ ऑनलाइन पद्धतीने झाला. यामुळे पालकांनीही  प्राथमिक वर्गासाठी शैक्षणिक साहित्यात आवश्यक असलेली पुस्तके , वह्य़ा खरेदीकडे पाठ फिरवली.

काही पालकांनी जुन्या वह्य़ा पुस्तकांवर नव्या शैक्षणिक वर्षांस सुरुवात के ली. काहींनी आपली जुने पुस्तके  रद्दी म्हणून दिली. परंतु, त्यांचे प्रमाण अतिशय कमी राहिले. या काळात वृत्तपत्र, मासिके  यांच्या वितरणातून करोना विषाणूचा फै लाव होत असल्याची अफवा समाज माध्यमातून पसरविली गेल्याने परिणामी बहुतांश घरांमध्ये येणारी वेगवेगळी वृत्तपत्रे येणे बंद झाले. त्याचाही परिणाम घराघरांमधील रद्दी कमी होण्यावर झाला.

अनेकांवर या काळात बेरोजगारी, पगारकपातीचे संकट ओढवल्याने कु ठलीही नवी अवाजवी खरेदी झाली नाही. खरेदी करतांना गरज असेल तरच करण्याकडे जागरुकता वाढली. त्यातही बाजारपेठेतील बहुतांश दुकाने वेगवेगळ्या टप्प्यात बंद राहिल्याने लोकांना खरेदी करण्यास फारशी संधीही मिळाली नाही.

नवीन वस्तू घरात येत नसल्याने घरातून जुन्या वस्तू बाहेर काढण्याचे प्रमाण कमी झाले. याचा अप्रत्यक्ष परिणाम भंगार व्यवसायावर झाला. गल्लीबोळात फिरणाऱ्या विक्र ेत्यांना भंगार मिळवण्यासाठी अडचणी येण्यास सुरूवात झाली.

एरवी सकाळ सत्रातील दोन-तीन तासातच बहुतेक भंगार जमा करणाऱ्यांच्या हातगाडय़ा भरून जात असत. परंतु, सध्या दिवसभर फिरुनही हातगाडी भरणे कठीण होत आहे. साधारणत: मार्च ते मे या कालावधीत घरातील साफसफाई होते. काही वेळा परीक्षांच्या निकालानंतर जुनी पुस्तके ,

वह्य़ा, न लागणारे घरातील छापील साहित्य, महिना किं वा वर्षभर साठवलेली वृत्तपत्राची रद्दी विकण्यासाठी दिली जाते. यंदा मात्र हे चित्र बदलले आहे.

मागील वर्षांत खरेदी न झाल्याने बहुतांश घरातील जुने सामान अर्थात भंगार बाहेर काढण्यात आले नाही. विशेष म्हणजे, तीन ते चार दिवस फिरल्यानंतर वह्य़ांचे पुठ्ठे, वस्तुंचे खोके , वृत्तपत्राची रद्दी असे सामान मिळते, अशी माहिती भंगार विक्रेते रमेश सोनजे यांनी दिली.

मागील वर्षी भंगारचा दर कमी होता. सध्या भंगार बाजारातील दर वाढले आहेत . या मध्ये लोखंड २४ रुपये किलो, प्लास्टिक १० रुपये, पुठ्ठा १२ रुपये किलो तर वृत्तपत्राची रद्दी २० रुपये किलो, वह्य़ा पुस्तकांची रद्दीही १० रुपये किलोपुढे गेली असल्याचे सोनजे यांनी नमूद केले.