नाशिक : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शनिवारी भाविक आणि सुरक्षारक्षक यांच्यात झालेल्या धक्काबुक्कीच्या प्रकारामुळे त्र्यंबकेश्वर येथील भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. शनिवारच्या प्रकारामुळे भाविकांकडून देवस्थान व्यवस्थापनाविरुध्द संताप व्यक्त करण्यात येत आहे. देवस्थानच्या सुरक्षारक्षकांकडून भाविकांना कायमच त्रास दिला जात असतानाही व्यवस्थापनाकडून त्यांच्याविरुध्द कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे भाविकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, श्रावण महिना आणि लागोपाठच्या सुट्ट्या यामुळे दर्शनासाठी गर्दी होणार हे माहीत असतानाही देवस्थानकडून कोणतेही नियोजन करण्यात न आल्याने अबालवृध्दांसह भाविकांची आबाळ झाली.

श्रावणात शिवभक्तीला विशेष महत्व आहे. त्र्यंबकेश्ववर मंदिरात दर्शनासाठी देशभरातून भाविक येत आहेत. १५ ऑगस्टपासून सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने शुक्रवारपासून भाविकांच्या गर्दीत अधिकच वाढ झाली. गर्दी वाढल्यास मंदिर व्यवस्थापनाकडून व्यवस्थित नियोजन केले जात नसल्याचे याआधीही दिसून आले आहे. शनिवारी पुन्हा तोच अनुभव आला. दुपारच्या सुमारास अचानक गर्दी वाढली. यामध्ये दक्षिण भारतीय भाविकांची संख्या अधिक होती. देवस्थान परिसरात दर्शन रांगेत होणारी गर्दी पाहता काही विश्वस्तांनी कुठल्याही प्रकारची पूर्वसुचना किंवा चर्चा न करता भाविकांच्या सोयीसाठी मुखदर्शन सुरू केले. उत्तर दरवाजा बंद केला गेला. हा दरवाजा बंद झाल्याने भाविकांचा संताप झाला. रांगेत चार ते पाच हजार भाविक असतांना दरवाजा का बंद केला, अशी ओरड करत काही भाविकांनी सुरक्षारक्षकांशी वाद घातला. गाभाऱ्यापर्यंत न नेता मंदिराच्या आवारात असलेल्या शिवमूर्ती, शिवलिंगाचे दर्शन सुरू केले. यामुळे काही भाविकांना देवस्थानच्या आवारात प्रवेश मिळाला. परंतु, पुढे दर्शन न घेता बाहेर काढून देण्यात आले. आपली फसवणूक होत असल्याचे भाविकांच्या लक्षात आले. दुसरीकडे विश्वस्थांच्या ओळखीतील काहींना गर्दी असतांनाही गाभाऱ्यापर्यंत जाता येत होते. याला काहींनी विरोध करायचा प्रयत्न केला. भाविकांच्या भावना लक्षात घेता देवस्थानने मुखदर्शन बंद करण्यासाठी दरवाजा बंद केला. आणि बाहेरील भाविकांनी त्यास विरोध केल्याने गोंधळ झाला.

या सर्व प्रकाराविषयी भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दीपक पाटील या भाविकाने त्याचा अनुभव मांडला. याआधी मी दोनवेळा त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी गेलो होतो. पहिल्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दर्शनासाठी आल्याने भाविकांना काहीवेळ थांबवून ठेवण्यात आले होते. दुसऱ्या वेळेस म्हणजे ज्या दिवशी धक्काबुक्कीचा प्रकार घडला, तेव्हा गर्दी असल्याने दर्शन न घेता परत फिरावे लागल्याचे त्यांनी सांगितले. राजेंद्र जोशी या भाविकाने देणगी दर्शनावर नाराजी व्यक्ती केली. भाविकांच्या श्रध्देवर पैसे कमविले जात असलल्याची टीका त्यांनी केली. विजय मोरे यांनी देवस्थानने देणगी दर्शन पध्दत कायमची बंद करण्याची मागणी केली. सामान्य माणसांना योग्य पध्दतीने दर्शन मिळेल, अशी व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भाविकांच्या तक्रारींची कोणतीही दखलर देवस्थानच्या वतीने घेण्यात येत नसल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सुरक्षारक्षकांची कायमच अरेरावी

त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या सुरक्षारक्षकांकडून भाविकांना कायमच अरेरावी केली जाते. याआधीही अशा काही घटना घडल्या आहेत. एकदा नाशिक येथील एक वकील आपल्या आईला घेऊन दर्शनासाठी आले होते. दर्शन रांगेत सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या आईला धक्का दिल्याने त्या पडल्या. याबाबत वकिलांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही सुरक्षारक्षकांनी अरेरावी केली. त्या प्रकरणातही देवस्थानच्या वतीने सुरक्षा रक्षकांची पाठराखण करण्यात आली होती.