२८ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

नाशिक :  शहरात ६० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीच्या कला, विज्ञान, वाणिज्य, किमान कौशल्य या शाखांसाठी २५ हजार २७० जागा उपलब्ध आहेत. ऑनलाइन ११ वी प्रवेशासाठी आतापर्यंत २८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यास बुधवारपासून सुरुवात होत आहे.

दुसऱ्या टप्प्यात महाविद्यालयांचा पसंतिक्रम आणि शाखानिवडीचा भाग भरण्यात येणार आहे. शिक्षण विभागाकडून या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. याअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात प्रवेशाचा अर्ज १२ ते २२ ऑगस्ट या कालावधीत भरण्यात येईल. याच काळात ज्या विद्यार्थ्यांना पहिला भाग भरता आलेला नाही त्यांनाही पहिला भाग भरता येणार आहे. तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी २३ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होईल. यादी संदर्भातील हरकती नोंदविण्याची मुदत २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ पर्यंत आहे. नियमित प्रवेश फेरी एकसाठी गुणवत्ता यादी ३० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होईल. तसेच यादीतील विद्यार्थ्यांना आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर अशी मुदत देण्यात आली आहे.

इन हाऊस किंवा अन्य कोटय़ामधून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या प्रक्रियेत सहभागी होण्याची गरज नाही, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ११ वीसाठी उपलब्ध जागांपेक्षा अर्जाची संख्या अधिक असल्याने हा तिढा सुटतो कसा, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. काही विद्यार्थ्यांनी आयटीआय, व्यावसायिक पदविका, गृह विज्ञान शाखेचा पर्याय निवडत ऑफलाइन पद्धतीने पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित केल्याने काही जागा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.