जम्मू-काश्मीरच्या कूपवाडा क्षेत्रात दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले चांदवड तालुक्यातील शहीद जवान शंकर शिंदे यांच्या कुटुंबीयांना शनिवारी शिवसेनेच्या वतीने पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. शहिदांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्चही शिवसैनिक उचलणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
दहशतवाद्यांशी दोन हात करताना वीरमरण पत्करणाऱ्या शिंदे यांच्या कुटुंबीयांना शिवसेना पाच लाखांची मदत करणार असल्याचे अंतिमसंस्कारावेळी सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी जाहीर केले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार मदतीचा धनादेश खा. हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आ. योगेश घोलप, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, जयंत दिंडे आदींनी शनिवारी भयाळे येथे शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन देण्यात आला. या वेळी वडील चंद्रभान शिंदे, आई सुमन आणि पत्नी सुवर्णा शिंदे उपस्थित होते. संपूर्ण देश व शिवसेना त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रसंगी शिवसैनिक सुशील भालेराव यांनी शहिदांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचे सांगितले.