नाशिक – लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपबरोबर नव्हे तर, भाजपच आमच्याबरोबर असल्याचा दावा अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी केला आहे. जाहीर प्रचाराच्या अखेरच्या दिवशी महाराजांनी केलेल्या विधानाने महायुतीत खळबळ उडाली. भाजपच्या नेत्यांना तसा कुठलाही विषय नसून आम्ही महायुती म्हणून एकत्र काम करीत असल्याचे सांगावे लागले.

नाशिक लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. शनिवारी जाहीर प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वपक्षीय उमेदवारांनी विविध माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन करीत मतदारांपर्यंत पोहोचण्याची धडपड केली. शांतिगिरी महाराजांनी गोदावरी काठावरून शहरात फेरी काढली. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी समाजाला जे विचार आवश्यक आहेत ते देण्याचा प्रयत्न आम्ही करीत असल्याचे नमूद केले. कोणताही पक्ष असो वा संघटना, ते आमच्या विचारांचे असतील तर आमच्याबरोबर आल्याशिवाय राहणार नाहीत. ज्यांना आमचे विचार भावतात ते बरोबर आले. निवडणुकीत भाजपही आमच्याबरोबर आहे, असे महाराजांनी नमूद केले. याआधी भाजप नेत्यांनी महाराजांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी नाशिक दौऱ्यात भेट घालून देण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, प्रचारात अडकलेले महाराज वेळेत पिंपळगाव बसवंतला पोहोचू शकले नव्हते.

हेही वाचा >>>नाशिकमध्ये गुन्हेगार तपासणी मोहीम

महाराजांच्या विधानाने महायुतीच्या गोटात संभ्रम पसरला. भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी तसा कुठलाही विषय नसल्याचे स्पष्ट केले. महायुती म्हणून आम्ही सर्व जण एकत्र काम करीत आहोत. आम्ही शांतिगिरी महाराजांना आपण एकाच विचारांचे असल्याने महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची विनंती केली होती. पण त्यांनी ऐकले नाही. त्यांनी ऐकले असते तर त्याचा फायदा नाशिकच्या जागेसाठी झाला असता, असे महाजन यांनी सूचित केले.

महाजन, बावनकुळे यांची उध्दव ठाकरेंवर टीका

पराभव समोर दिसत असल्याने उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यांच्यामागे जनाधार राहिलेला नाही. त्यामुळे ते काही बोलले तरी त्यांना उत्तर देणे आमचे दायित्व नसल्याचे महाजन यांनी सांगितले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी काही अनुचित विधान करू शकत नसल्याचा दावा त्यांनी केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांच्यावर टिकास्त्र सोडले. ठाकरे हे चिडलेले, घाबरलेले आहेत. चोरांचे सरदार कोण आहेत, हे राज्याने पाहिले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्य लुटले, मुंबई मनपा लुटली गेली, असा आरोप त्यांनी केला.