जळगाव : जिल्ह्यातील जामनेर तालुका भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला मानला जातो. आणि यावेळी सातव्यांदा ते विजयी झाले आहेत. याच मतदारसंघावर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्यासह तालुकास्तरावरील प्रमुख पदांवर मराठा आणि बंजारा समाजाला मुद्दाम झुकते माप देण्याची खेळी शरद पवार गटाने खेळली आहे. ज्यामुळे मंत्री महाजन यांच्यासह त्यांचे समर्थक चांगलेच कोड्यात पडले आहेत.

जामनेरच्या सरपंचपदापासून राजकीय कारकीर्द सुरू करणारे मंत्री गिरीश महाजन हे १९९५ पासून सातत्याने विधानसभेवर निवडून येत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या विरोधात जेवढ्या काही उमेदवारांनी निवडणूक लढली, त्यापैकी काही नंतरच्या काळात भाजपला जाऊन मिळाले. १९९५ मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढली तेव्हा महाजन यांना फक्त ६३ हजार ६६१ मते मिळाली होती. त्यानंतर मात्र त्यांच्या मतांमध्ये उत्तरोत्तर वाढ होत गेली.

अलिकडे पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांना सुमारे एक लाख २८ हजार ६६७ मते मिळाली. परंतु, महाजन यांच्यासाठी ही निवडणूक खूपच आव्हानात्मक ठरली. कारण गेल्या ३० वर्षात प्रतिस्पर्धी एकाही उमेदवाराला मिळाली नाही, तेवढी मते (एक लाख एक हजार ७८२) शरद पवार गटाचे उमेदवार दिलीप खोडपे यांना मिळाली.

विधानसभा निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांना उमेदवारी देऊन मराठा समाजाला आपल्या बाजुने वळविण्यात शरद पवार गट बऱ्यापैकी यशस्वी झाला होता. तशात जामनेर तालुक्यातील लिहा तांडा येथे भंडाऱ्यानिमित्त मंत्री महाजन आले असता गेल्या ३० वर्षापासून आम्ही तुम्हाला निवडून देत आहोत. तरी आमच्या गावातील रस्त्यांची अशी दुरावस्था का ? असा जाब तेथील ग्रामस्थांनी विचारला होता. ज्या कारणाने, जामनेरमधील बंजारा समाजाची वस्ती असलेल्या बऱ्याच गावांमध्ये महाजन यांच्या विरोधात निवडणूक काळात वातावरण तयार झाले होते.

ही दोन्ही कारणे लक्षात घेता मराठा, बंजारा आणि इतरही दुसऱ्या समाजांना सोबत घेऊन मंत्री महाजन पर्यायाने भाजपला तोंड देण्याची रणनिती शरद पवार गटाने आतापासून आखली आहे. शरद पवार गटाने युवक जिल्हाध्यक्षपदी पाळधी (ता. जामनेर) येथील मराठा समाजातील  विश्वजित पाटील यांना नुकतीच संधी दिली. त्यानंतर आता जामनेर तालुका युवक अध्यक्षपदी पळासखेडा काकर येथील बंजारा समाजाचे रोहन राठोड आणि जामनेर शहर युवक अध्यक्षपदी दत्तात्रय नेरकर यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय, विधानसभा क्षेत्र युवक अध्यक्षपदी पवन महाजन, युवक तालुका कार्याध्यक्षपदी अमोल पवार, संघटकपदी अनिल पाटील, विस्तारकपदी मयूर पाटील, सचिवपदी राजेश चव्हाण यांची नियुक्ती शरद पवार गटाने केली आहे. या आधीच्या तालुका कार्यकारिणीत समाविष्ट असलेल्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आले.