धुळे : सुरत ते नागपूर बायपास चौपदरीकरण कामांतर्गत धुळे परिसरात पथदिवे सुरु न झाल्याने प्रकल्प संचालक अजय यादव यांना दोन ते तीन तास घेराव घालून संतप्त शिवसैनिकांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कार्यालयाला कुलूप लावले.शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या सुचनेनुसार स्व.धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानचे अजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. धुळे शहरातून जाणाऱ्या सुरत-नागपूर बायपास महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण होऊन पाच वर्षे उलटली आहेत.

पथदिव्यांचे खांब व दिवे बसवूनही आजपर्यंत या ठिकाणी वीज पुरवठा सुरू झालेला नाही. परिणामी, चक्करबर्डी, चितोड आणि मिल परिसरातील रहिवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. रहिवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. या वळण रस्त्यावर भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय असून या रुग्णालयात येणारे रुग्ण मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून येतात. त्यापैकी अनेक जण प्रथमच येत असल्याने त्यांना रुग्णालयाचा शोध घेत फिरावे लागते. त्यातच रुग्णांचे नातेवाईक रात्री आल्यास पथदिव्यांअभावी अंधारात त्यांना सर्वोपचार रुग्णालयाचा शोध घेत फिरावे लागते. यामुळे प्रामुख्याने महिलांची, रुग्णालयाचे कर्मचारी आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.,

रात्री लुटमारीच्या घटनाही घडत आहेत. अंधारात एकट्याला गाठून लुटले जात असल्याने पथदिव्यांची आवश्यकता निर्माण झाली आहे. तीन महिन्यांपूर्वी तीव्र आंदोलन करूनही चक्करबर्डी परिसरातील सुरत-नागपूर बायपास महामार्गावर अद्यापही पथदिवे सुरू झालेले नाहीत. त्यामुळे संतप्त शिवसैनिक शुक्रवारी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कार्यालयात पोहोचले. कार्यालयाला कुलूप लावत त्यांनी तीव्र आंदोलन केले.

कामचुकार अधिकाऱ्यांची उदासीनता अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा यावेळी संतप्त शिसैनिकांनी दिला. सात दिवसांत पथदिवे सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा तीन महिन्यांपूर्वी झालेल्या आंदोलनात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित व्यवस्थापनाला दिला होता. त्यावेळी संबंधित व्यवस्थापनाने पथदिवे सुरू करण्याचे तोंडी आश्वासन शिष्टमंडळाला दिले होते. परंतु, तीन महिने उलटल्यावरही या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. यामुळे संतप्त शिवसैनिक पुन्हा कार्यालयात धडकले. आठवडाभरात पथदिवे सुरू न झाल्यास सुरत-नागपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी रस्ता सुरक्षा समितीचे रवीद्र शिंदे, अध्यात्मिक सेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, शेखर बडगुजर, पवन शिंदे, मयूर बोरसे आदी उपस्थित होते.