एकनाथ शिंदे, दादा भुसे आज नाशिकमध्ये
भाजपचा कार्यक्रम उधळून लावण्याच्या प्रकरणात कारागृहात गेलेल्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आणि शिवसैनिकांची सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे आणि सहकार राज्यमंत्री दादा भुसे हे शुक्रवारी भेट घेणार आहेत. या अनुषंगाने शिवसेना कार्यालयात बैठकही होईल. आंदोलनावेळी हाती लागलेल्या सेनेच्या महिला आघाडी पदाधिकाऱ्यास भाजपच्या महिलांनी झोडपले. जवळपास अर्धा ते पाऊस तास कार्यक्रमस्थळी पकडून ठेवले. गुन्हा दाखल करताना दरोडय़ासारख्या गंभीर गुन्ह्याचे कलम लावून शिवसैनिकांना अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा सेनेचा आक्षेप आहे. या घटनेत भाजप आक्रमक तर शिवसेना बचावात्मक भूमिकेत राहिल्याचे प्रथमच पाहावयास मिळाले. या सर्व घटनाक्रमाची गंभीर दखल घेत वरिष्ठांनी सेनेच्या मंत्र्यांना नाशिकला धाडत उपरोक्त घटनेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेना यांच्यात निर्माण झालेला बेबनाव उपरोक्त घटनेमुळे थेट हाणामारीवर गेल्याचे स्पष्ट झाले. मागील सात ते आठ महिन्यांपासून भाजप आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेने मोर्चा काढून भाजपा मंत्र्यांविरोधात आगपाखड केली होती.
पालिका निवडणूक दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढविणार असल्याने हा संघर्ष शिगेला पोहोचणार असल्याचे दिसत असतानाच हे रणकंदन उडाले. भाजप महिला आघाडीतर्फे आयोजित महिलांचा सत्कार सोहळा सेनेच्या महिला पदाधिकारी व शिवसैनिकांनी धुडगूस घालत उधळण्याचा प्रयत्न केला. यावेळी हाती लागलेल्या सेनेच्या महिलांना भाजपच्या महिलांनी बेदम झोडपले.
या प्रकरणी भाजप आमदारांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत शिवसेनेच्या सत्यभामा गाडेकर यांच्यासह नऊ जणांना अटक केली. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
भाजपचे शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप, आ. प्रा. देवयानी फरांदे व सीमा हिरे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन गोंधळ घालणाऱ्या सर्वाना अटक करण्याची मागणी लावून धरली आहे.
भाजपच्या ताब्यात अडकून पडलेल्या आंदोलकांची सोडवणूक करण्यासाठी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले नसल्याची भावना शिवसैनिकांमध्ये आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत सेना-भाजपमध्ये असेच रणकंदन उडाले होते. नाशिकमध्ये भाजपने कायद्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास त्यास चोख प्रत्युत्तर देण्याची सेनेची तयारी असल्याचे करंजकर यांनी म्हटले आहे. शिवसेनेतील या घडामोडींवर भाजपचे पदाधिकारी नजर ठेवून आहेत.

गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपचा पोलीस यंत्रणेवर दबाव – जिल्हाप्रमुख
शिवसेनेचे पदाधिकारी भाजपवर तोफ डागत आहेत. राजकीय स्वरूपाचे आंदोलन असताना भाजपने पोलीस यंत्रणेवर दबाव आणून दरोडय़ासारखा गंभीर गुन्हा दाखल केल्याचा आरोप जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी केला. थेट मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनी करून यंत्रणेवर दबाव टाकला. या प्रकाराची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, संपर्क नेते आ. अजय चौधरी हे सेनेचे नेते शुक्रवारी नाशिकला येत आहेत. सकाळी ११ वाजता त्यांच्या उपस्थितीत स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. त्यानंतर नाशिकरोड कारागृहात जाऊन गाडेकर व शिवसैनिकांची सेना नेते भेट घेणार असल्याचे करंजकर यांनी सांगितले. या घडामोडीत सेनेतील अंतर्गत मतभेद चव्हाटय़ावर आले आहेत.