लोकसत्ता वार्ताहर

नंदुरबार: राज्यात खारघर दुर्घटनेनंतरचा सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम येथे शनिवारी भर दुपारी होणार असून या कार्यक्रमाला एक लाखाहून अधिक भाविकांची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. शिवसेना (शिंदे गट) संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांच्या रुग्णालयाचे लोकार्पण शिवकथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. लोकार्पण सोहळ्यानंतर तीन तासांचा शिवकथा कार्यक्रम होणार आहे. खारघर दुर्घटनेच्या पार्श्वभूमिवर आयोजकांतर्फे सर्व प्रकारची काळजी घेण्यात येत आहे.

नंदुरबारमध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती मल्टिस्पेशालिटी या रुग्णालयाचे शनिवारी लोकार्पण होत आहे. या रुग्णालयाच्या उदघाटन सोहळ्यास शिवकथाकार पंडित मिश्रा उपस्थित राहणार आहेत. सकाळी १० वाजता ते मध्यप्रदेशातील सिवर येथून नंदुरबारकडे हेलिकॉप्टरने येतील. शहरातील प्रमुख रस्त्यावरुन त्यांची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. दुपारी १२.३० वाजता ते रुग्णालयाच्या उदघाटनासाठी पोहचणार असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेही उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा… नाशिक : बहुतांश बाजार समित्यांमध्ये दुरंगी लढत, शिंदे गट-भाजप युती विरोधात महाविकास आघाडी मैदानात

उदघाटनानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लगेच मुंबईकडे रवाना होणार असून पंडित मिश्रा यांचा तीन तासांचा शिवकथा कार्यक्रम लगतच्या मैदानावर होणार आहे. खारघर दुर्घटनेच्या पार्श्वभूमिवर सतर्कता बाळगण्यात येत असून एक लाखाहून अधिक लोकांसाठी मंडप उभ्यारण्यात आला आहे. भाविकांसाठी दोन लाख पाणी बाटल्यांचे नियोजन करण्यात आले आहे. फिरत्या शौचालयांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा… नाशिक : सिडकोत वाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपातकालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक कार्यक्रमस्थळी तैनात राहणार आहे. या कार्यक्रमाला येणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बदलली आहे. सर्व वाहतूक बंद करुन ती अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. जिल्हाभरातून पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे.