भाजपच्या जागांमध्ये एकाची वाढ, शिवसेनेचे चार आमदार पराभूत

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना धोबीपछाड देत राष्ट्रवादीने ग्रामीण भागातील सर्वाधिक सहा जागांवर विजय मिळवत जिल्ह्य़ात आपले स्थान बळकट केले. अतिशय चुरशीच्या लढतीत भाजपने पाच जागांवर विजय मिळवला तर मित्रपक्ष शिवसेनेला सात जागांवर पराभवाला तोंड द्यावे लागले. यामध्ये सेनेने देवळाली हा बालेकिल्लाही गमावला. सेनेला केवळ दोन जागा मिळाल्या. काँग्रेस आणि एमआयएम यांना प्रत्येकी एक जागा मिळाली. मागील निवडणुकीची तुलना केल्यास राष्ट्रवादीला दोन, तर भाजपला एका जागेचा लाभ झाला. शिवसेनेला दोन, तर काँग्रेस आणि माकपचे प्रत्येकी एका जागेचे नुकसान झाले. एमआयएमला एका जागेचा फायदा झाला आहे.

जिल्ह्य़ातील १५ विधानसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल लागले. महायुती आणि विरोधकांमध्ये एकतर्फी लढत होईल, असे रंगविलेले चित्र निकालांती फोल ठरले. ग्रामीण भागात शिवसेनेला मोठा फटका बसला. देवळालीमध्ये राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे यांनी ८४३२६ मते मिळवत सेनेचे योगेश घोलप (४२६२४) यांना पराभूत केले. या निकालाने घोलप यांची मतदारसंघावरील सद्दी संपुष्टात आली आहे. तीन दशकांपासून हा मतदारसंघ घोलप कुटुंबियांच्या ताब्यात होता. भाजपच्या नगरसेविका राहिलेल्या सरोज यांना पक्षांतर फलदायी ठरले. मात्र, दोनवेळा काँग्रेसच्या तिकीटावर आमदार राहिलेल्या निर्मला गावित यांना मात्र इगतपुरीत शिवसेनेतील प्रवेश नुकसानकारक ठरले. काँग्रेसच्या हिरामण खोसकर यांनी ८६,५६१ मते मिळवत गावितांना (५५००६) घरचा रस्ता दाखवला. सिन्नरमध्ये राष्ट्रवादीचे माणिक कोकाटे यांनी ५८,६१९ मते घेऊन सेनेचे आमदार राजाभाऊ वाजे (५३०७८) यांना पराभूत करीत सर्वाना धक्का दिला.

सेना बंडखोरामुळे चर्चेत आलेल्या नाशिक पश्चिम मतदारसंघात चुरशीच्या लढतीत भाजपच्या सिमा हिरे यांनी नऊ हजारहून अधिक मतांची आघाडी घेत विजयाचा मार्ग प्रशस्त केला.  अपूर्व हिरे हे पराभवाच्या छायेत सापडले. २७ व्या फेरीपर्यंत सीमा हिरे यांना ७५ हजार, तर अपूर्व हिरे यांना ६४६०० मते मिळाली. सेनेचे बंडखोर विलास शिंदे यांना केवळ १६ हजाराचा पल्ला गाठता आला. तीन यंत्रात बिघाड झाल्यामुळे रात्री उशिरापर्यंत मतदारसंघात मोजणी सुरू होती. नाशिक पूर्वमध्ये दोन आयारामांची लढत रंगतदार ठरली. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या जागेवर भाजपच्या राहुल ढिकले यांनी राष्ट्रवादीच्या

बाळासाहेब सानप यांच्यावर १२ हजारहून अधिक मतांनी आघाडी घेतली. उमेदवारांनी वारंवार आक्षेप घेतल्याने मोजणीला विलंब झाला. रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी मोजणी सुरू होती. परंतु, ते मताधिक्य सानपांना गाठणे अवघड झाले आहे. नाशिक मध्यमध्ये भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी ७३४६० मते मिळवत काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील (४५०६२) यांना पराभूत केले. या ठिकाणी मनसेचे नितीन भोसले थेट तिसऱ्या स्थानी फेकले गेले.

येवला मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून येणाऱ्या छगन भुजबळांनी महायुतीचे संभाजी पवार यांचे आव्हान मोडून काढले. शिवसेनेने चांगलाच जोर लावूनही ही जागा सेनेला मिळवता आली नाही. भुजबळ यांनी ५३ हजारहून अधिकच्या मताधिक्याने पवारांना पराभूत केले. नांदगाव मतदारसंघाची जागा मात्र राष्ट्रवादीला गमवावी लागली. भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना शिवसेनेचे सुहास कांदे यांच्याकडून १३ हजार मतांनी पराभवाचे धनी व्हावे लागले. दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळ यांनी १०५९६९ मते मिळवत शिवसेनेचे भास्कर गावित (५३३६७) यांना मोठय़ा फरकाने पराभूत केले. चांदवडमध्ये भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी ७९७६६ काँग्रेसचे शिरीष कोतवाल यांना (४६३७०) यांना पराभूत केले.

मालेगाव बाह्य़मध्ये शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे यांनी काँग्रेसच्या डॉ. तुषार शेवाळे यांचा ४८ हजार मतांनी दणदणीत पराभव केला. मालेगाव मध्यमध्ये एमआयएमचे मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी काँग्रेसचे आमदार आसिफ शेख यांचा ३८ हजाराच्या मताधिक्याने पराभूत केले. या निमित्ताने एमआयएमने जिल्ह्य़ात आपले खाते उघडले आहे. निफाडमध्ये सेनेचे आमदार अनिल कदम यांनाही पराभवाचे धनी व्हावे लागले. राष्ट्रवादीचे दिलीप बनकर यांनी १७,६६८ मतांनी त्यांना पराभूत केले. बागलाणमध्ये भाजपचे दिलीप बोरसे यांनी राष्ट्रवादीच्या आमदार दीपिका चव्हाण यांना ३४ हजारांच्या फरकाने पराभूत केले. कळवण मतदारसंघात चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादीच्या नितीन पवार यांनी माकपचे आमदार जिवा पांडू गावितांचा साडेसहा हजाराच्या मताधिक्याने पराभव केला.

नऊ आमदारांना घरचा रस्ता

मतपेटीतून बाहेर आलेला निकाल विद्यमान आमदारांना हादरे देणारा ठरला. जिल्ह्य़ातील १५ पैकी नऊ मतदारसंघात मतदारांनी आमदारांना झिडकारले. पक्षांतर करून सत्ताधारी पक्षात जाण्याची मनिषा बाळगणाऱ्या निर्मला गावित, देवळातीतील सेनेचे आमदार योगेश घोलप, निफाडचे आमदार अनिल कदम, सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे, नांदगावचे पंकज भुजबळ, बागलाणच्या दीपिका चव्हाण, मालेगाव मध्यमधील काँग्रेसचे आमदार आसिफ शेख, कळवण मतदारसंघातील माकपचे आमदार जिवा पांडू गावित यांना पराभवाचे धनी व्हावे लागले. पराभूत होणाऱ्या आमदारांमध्ये सेनेचे सर्वाधिक चार, राष्ट्रवादीचे दोन, काँग्रेस आणि माकपच्या आमदाराचा समावेश आहे. सहा आमदारांना पुन्हा विधानसभेत जाण्याची संधी मिळाली. यामध्ये भाजपच्या सीमा हिरे, देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर, राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे दादा भुसे यांचा समावेश आहे.