जळगाव – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचे वेध लागल्यानंतर महापालिकेवर झेंडा फडकाविण्यासाठी शिवसेनेने (उध्दव ठाकरे) तयारीला वेग दिला आहे. पक्षाचे नेते खासदार संजय राऊत आणि इतर नेते शुक्रवार आणि शनिवारी दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर येत असून, प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निवडणुकीची व्यूहरचना आखण्यात येणार आहे.

लोकसभेसह विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये मरगळ आलेली होती. त्यात, अनेक मातब्बर अलिकडच्या काळात महायुतीत सामील झाल्याने विशेषतः शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. अशा स्थितीत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लढण्यासाठी अंगात अजिबातच बळ शिल्लक न राहिलेल्या पक्षाला पुन्हा नवी उभारी देण्याच्या हालचाली ठाकरे गटाकडून सुरू झाल्या आहेत.

पक्षावर निष्ठा ठेवून इतके दिवस थांबून असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावण्याचे कामही त्यामाध्यमातून केले जाणार आहे. त्याअनुषंगाने ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत, उपनेते संजय सावंत, आमदार मनोज जामसुतकर आदी नेते मंडळी दोन दिवस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा नियोजनानुसार, शुक्रवारी जळगावमधील निवडक पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या स्थितीचा कानोसा घेतला जाणार आहे. याशिवाय, शनिवारी अजिंठा विश्रामगृहात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जळगाव महापालिकेत २०१८ च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. प्रत्यक्षात भाजपने सर्वाधिक जागा पटकावत वर्चस्व प्रस्थापित केले होते. मात्र, शिवसेनेने नंतरच्या काळात काही नगरसेवक फोडून महापालिकेची सत्ता ताब्यात घेत भाजपला मोठा धक्का दिला होता. शिवसेनेतच दोन गट पडले आहेत. मतविभागणीचा मोठा फटका ठाकरे गटाला विधानसभेच्या निवडणुकीतही बसला होता. त्यामुळे महापालिकेची सत्ता ताब्यात घेणे ठाकरे गटासाठी पूर्वी इतके इतके सोपे यावेळी निश्चितच असणार नाही. त्यापार्श्वभूमीवर खासदार राऊत व इतर नेते मंडळी ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेणार आहेत.