शिवसेनेने आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपला घेरण्याची तयारी चालविली आहे.
नाशिकमध्ये नागरी प्रश्नांवर काढण्यात येणारा मोर्चा हे त्याचे निदर्शक ठरले आहे. ढासळती कायदा आणि सुव्यवस्था आणि नव्या टीडीआर धोरणावरून मुख्यमंत्री, गंगापूरचे पाणी मराठवाडय़ासाठी सोडल्यावरून जलसंपदा तथा नाशिकचे पालकमंत्री, मराठवाडा-विदर्भातील उद्योगांना विशेष वीज दरात सवलत देणारे ऊर्जामंत्री, आरोग्य विद्यापीठाचे विभाजन करून ते नागपूरला स्थलांतरीत करण्याच्या कथित मुद्यावरून वैद्यकीय शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री अशा भाजपच्या प्रमुख नेत्यांवर शिवसेना मोर्चाद्वारे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे शरसंधान साधण्याची तयारी करत आहे. विशेष म्हणजे, या मोर्चात सर्व घटकांनी सहभागी व्हावे, याकरीता सेनेचे पदाधिकारी उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, वास्तुविशारद, विद्यापीठ अधिकारी-कर्मचारी अशा विविध संघटनांशी प्रथमच सुसंवाद साधताना दृष्टिपथास पडत आहे.
गतवेळी भाजपने अखेरच्या टप्प्यात पालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याचे निश्चित करत गाफील राहिलेल्या शिवसेनेला कात्रजचा घाट दाखविला होता. विधानसभा निवडणुकीत वरचढ ठरल्यानंतर भाजप सेनेला हिंग लावून विचारत नाही. महत्त्वाची खाते स्वत:कडे ठेवत आपली बलस्थाने भक्कम करताना भाजपचे काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेला नामोहरण करण्याचे प्रयत्न लपून राहिलेले नाही. त्यामुळे नाशिक पालिकेच्या आगामी निवडणुकीत स्वबळाचे धोरण कायम ठेवत शिवसेना हा मुख्य शत्रू राहणार असल्याचे भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेतर्फे १९ मार्च रोजी काढण्यात येणारा ‘नाशिक वाचवा’ मोर्चा भाजपची शक्य तितकी कोंडी करण्याचा एक भाग आहे. पाणी कपातीमुळे त्रस्तावलेल्या शहरवासीयांच्या लेखी या समस्येला भाजपला जबाबदार ठरविण्याची सर्वपक्षीयांमध्ये स्पर्धा लागली आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकच्या पालक मंत्रीपदाची जबाबदारी आहे. वाढीव कपातीची गरज नसल्याचे पत्र देऊन आणि नंतर जादा पाणी आरक्षित करून भाजपने आपल्या दाव्यातील फोलपणा उघड केला. मराठवाडय़ासाठी पाणी पळविल्याने नाशिकवर हे संकट कोसळले असून भविष्यात तसे घडू नये, या मागणीकडे सेना लक्ष वेधत आहे. नाशिकची कायदा व सुव्यवस्था ढासळत असून राजाश्रय लाभलेले गुन्हेगार पोलिसांना सापडत नसल्याने गृह खात्याचे अपयश दर्शविले जाणार आहे. ऊजामंत्री बावनकुळे यांनी विदर्भ व मराठवाडय़ातील उद्योगांना वीज दरात विशेष सवलत देण्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे स्थानिक उद्योजकांमध्ये अस्वस्थता असून तो धागा पकडत सेनेने पाण्यासाठी समन्यायी धोरण आणि वीज देयकासाठी दुजाभाव का, हा प्रश्न केला. आरोग्य विद्यापीठाचे विभाजन करून काही वैद्यकशाखा नागपूरला नेण्याचा डाव असल्याचा आरोप करत यावरून भाजपची कोंडी करण्याची व्यूहरचना आखण्यात आली आहे. नाशिकवर होणाऱ्या अन्यायाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसेनेचे प्रत्येक प्रभागात बैठका, चौक सभांचे सत्र सुरू आहे. उद्योजकांची निमा, वास्तुविशारद, आरोग्य विद्यापीठ व मुक्त विद्यापीठ कर्मचारी आदी संघटनांशी चर्चा केली जात असून सर्व घटक मोर्चात सहभागी होणार असल्याचे अजय बोरस्ते यांनी सांगितले.
‘मनसेमध्ये नव्हतोच’
राज ठाकरे यांच्याशी असणाऱ्या संबंधामुळे काही काळ त्यांच्यासमवेत होतो. आपण कधीही मनसेमध्ये गेलो नव्हतो. नंतरच्या काळात वैद्यकीय कारणास्तव विश्रांती घ्यावी लागली. परंतु, आता पुन्हा आपल्याच पक्षात म्हणजे शिवसेनेत पुन्हा सक्रिय झाल्याचा दावा शुक्रवारी अभय उगावकर यांनी केला.