नाशिक : तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त शिवभक्तांची त्र्यंबकेश्वर परिसरात होणारी गर्दी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिक आगाराकडून रविवार आणि सोमवारी २७० जादा बस सोडण्यात येणार आहेत.

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी श्रावणातील प्रत्येक दिवशी गर्दी होत आहे. तिसऱ्या सोमवारी गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता आहे. रविवार आणि सोमवारी महामंडळाच्या वतीने रविवारी सकाळी आठ ते सोमवारी पुढील आदेश येईपर्यंत नाशिक येथील नवीन बस स्थानकातून जादा बस सोडण्यात येणार आहेत. नाशिक ते त्र्यंबक १९०, अंबोली ते त्र्यंबक १०, पहिने ते त्र्यंबक १०, घोटी ते त्र्यंबक १०, खंबाळे ते त्र्यंबक ५० अशा २७० जादा बससेवेचे नियोजन आहे. नाशिक -त्र्यंबकेश्वर मार्गावर दैनंदिन असलेल्या १६० फेऱ्यांव्यतिरिक्त ही जादा बससेवा राहणार आहे.नाशिक – त्र्यंबकेश्वरसाठी सध्या साध्या बसचे ५१ तर ई बससाठी ७३ रुपये तिकिट आकारण्यात येते.

दरम्यान, तिसऱ्या श्रावणी सोमवारची गर्दी ही प्रशासनाची कसोटी पाहणारी ठरणार आहे. या अनुषंगाने वैद्यकीय, पोलीस व्यवस्था चोख ठेवण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. आरोग्यविषयक विविध शिबिरे होणार आहेत. त्र्यंंबक नगरपालिकेच्यावतीने भाविकांसाठी पिण्याचे पाणी, फिरते शौचालय आदी व्यवस्था करण्यात येणार आहे. या काळात बाहेरगावहून येणाऱ्या वाहनांना त्र्यंबकेश्वरमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही.

उत्पन्नवाढीची अपेक्षा

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने यात्रा उत्सव काळात भाविकांची होणारी गर्दी पाहता विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात येते. श्रावणात भाविकांची त्र्यंबकेश्वर येथे होणारी गर्दी तसेच इगतपुरी येथील सर्वतीर्थ टाकेद या ठिकाणी गर्दी होते. या अनुषंगानेही त्र्यंबकेश्वर, इगतपुरी परिसरात जादा बसचे नियोजन आहे. ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला या काळात महत्व असल्याने महामंडळाच्या वतीने रविवार पासूनच त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी बसची व्यवस्था आहे. या माध्यमातून महामंडळाच्या अर्थकारणाला गती मिळेल असा विश्वास व्यक्त होत असला तरी खासगी वाहने तसेच भाविकांचा प्रतिसाद यावर पुढील गोष्टी अवलंबून आहे. महामंडळाच्या लालपरीची दुरावस्था चर्चेचा विषय ठरतो.