जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत १० दिवसांपूर्वी चांदीचे दर उच्चांकी एक लाख २० हजार रूपये प्रति किलोपर्यंत जाऊन पोहोचले होते. मात्र, आता तब्बल सहा हजाराने दर खाली आल्याने चांदीचा तोरा आता उतरला आहे. सोन्याच्या दरातही काहींअशी घट नोंदविण्यात आल्याने ग्राहकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.जळगावमध्ये २३ जुलैला २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति तोळा एक लाख तीन हजार ८२४ रूपयांपर्यंत होते. त्यानंतर शनिवारी सकाळी बाजार उघडल्यावर सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा एक लाख दोन हजार ७९४ रूपयांपर्यंत नोंदविण्यात आले. १० दिवसात सोन्याच्या दरात १०३० रूपयांची घट झाल्याचे दिसून आले.
मधल्या काळात कमी-अधिक फरकाने सोन्याच्या दरात चढ उतार सुरूच राहिले. अशाच प्रकारे २३ जुलैला चांदीचे दर जीएसटीसह एक लाख २० हजार ५१० रूपये प्रति किलोपर्यंत जाऊन पोहोचले होते. त्यानंतर शनिवारी चांदीचे दर एक लाख १४ हजार ३३० रूपये प्रति किलोपर्यंत खाली आले. १० दिवसात चांदीच्या दरात तब्बल ६१८० रूपयांची घट झाल्याचे दिसून आले. दर खालावल्याने व्यावसायिकांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.
सोने आणि चांदीच्या किमतीत सध्या झालेली घसरण ग्राहकांसाठी खरेदीची एक चांगली संधी ठरू शकते, असे अनेक सुवर्ण व्यवसायातील तज्ज्ञांचे मत आहे. विशेषतः सण-उत्सव आणि लग्न समारंभासाठी किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही योग्य वेळ असू शकते. ऑगस्ट महिन्यात बाजारात झालेल्या हालचाली लक्षात घेतल्या असता, खरेदी करण्यापूर्वी सध्याच्या दरांची अचूक माहिती घेणेही तितकेच आवश्यक आहे. दुसरीकडे, काही आर्थिक विश्लेषकांचे म्हणणे आहे की दिवाळीपर्यंत चांदीची किंमत पुन्हा एक लाख २० हजार रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकते. अशा स्थितीत, चांदी ही फक्त पारंपरिक दागिन्यांपुरती मर्यादित न राहता एक मजबूत गुंतवणूक पर्याय म्हणूनही पुढे येऊ शकते. त्यामुळे ज्या ग्राहकांना स्थिर आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय हवा आहे, त्यांनी सध्याची संधी विचारपूर्वक वापरणे हितावह ठरू शकते.
सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीमागे मुख्यतः अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणाचा प्रभाव आहे. फेडने अद्याप व्याजदर कपातीचे कोणतेही स्पष्ट संकेत दिलेले नाहीत. यामुळे महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढेही आक्रमक धोरण कायम राहण्याचे संकेत मिळतात. उच्च व्याजदरांच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार व्याज उत्पन्न न देणाऱ्या मालमत्तांपासून दूर राहण्याचा कल दाखवत आहेत. परिणामी, सोन्याची मागणी घटून किमती खाली येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्याचबरोबर, अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने इतर देशांच्या चलनांची किंमत घसरली आहे. भारतासारख्या देशांमध्ये याचा थेट परिणाम सोन्याच्या आयात खर्चावर झाला असून, आयात अधिक महाग झाल्यामुळे देशांतर्गत मागणीवर मर्यादा येत आहे. मागणीतील ही घट बाजारात किमती घसरण्यास कारणीभूत ठरत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.