नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, चेहेडी आणि पंचक येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्रांच्या उभारणीसाठी तब्बल ७९६ झाडांवर कुऱ्हाड चालविली जाणार आहे. ही झाडे तोडण्यास महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीने मान्यता दिली.
गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने अस्तित्वातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रांचे (एसटीपी) नुतनीकरण आणि नव्याने चार केंद्रांची बांधणीचे नियोजन केले आहे. त्या अंतर्गत पंचक आणि चेहेडी येथे नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे. पंचक येथील जागेत ५२१ वृक्ष अडथळा ठरत आहेत. तर चेहेडी येथील जागेत २७५ वृक्ष अडथळा ठरत असल्याचे संबंधित विभागाचे म्हणणे आहे. या दोन्ही जागेवरील एकूण ७९६ वृक्ष तोडण्यासाठी उद्यान विभागाकडे स्वतंत्रपणे प्रस्ताव सादर झाले होते. वृक्ष प्राधिकरण समितीने काही अटी व शर्तींंवर त्यास मान्यता दिली.
पंचक येथे ५२१ झाडे तोडण्यापूर्वी या वृक्षांच्या वयाइतकी ५५४६ वृक्षांची तर, चेहेडी येथील २७५ झाडे तोडण्याआधी या वृक्षांच्या वयाइतकी २६८४ वृक्षांची लागवड करणे बंधनकारक केले आहे. लागवड केलेल्या सर्व वृक्षांची देखभाल आणि ती वृक्ष जिवंत असल्याचा अहवाल दर सहा महिन्यांनी सादर करावा, असे समितीने म्हटले आहे. दरम्यान, सिंहस्थात सांडपाणी प्रक्रिया केंद्रांबरोबर विविध प्रकारची कामे नियोजित आहेत. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होण्याची भीती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
अटी-शर्तीचे अनोखे तंत्र
वृक्ष प्राधिकरण समितीने चेहेडी आणि पंचक येथेील झाडे तोडण्यास परवानगी देताना अटी-शर्तीचे अनोखे तंत्र अवलंबल्याचे दिसून येते. तोडण्यात येणाऱ्या झाडांच्या वयाइतकी देशी प्रजातींची एकूण ८२३० वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करणे बंधनकारक केले आहे. इतक्या मोठ्या संख्येने त्या वयाची इतकी झाडे कशी मिळतील, हा प्रश्न आहे. हे समितीलाही ज्ञात असावे. त्यामुळे किमान आठ फूट उंचीच्या वृक्षाची लागवड करण्यास मुभा दिली आहे.
लागवड, संगोपनासाठी ८२ लाखाची तरतूद
या वृक्षांची लागवड व सात वर्ष संगोपन याचा प्रति झाड एक हजार रुपये खर्च गृहीत धरण्यात आला. त्यानुसार पंचक येथील केंद्रासाठी लागवड करावयाच्या ५५४६ झाडांसाठी ५५ लाख ४६ हजार तर, चेहेडी केंद्रासाठी लागवड करावयाच्या २६८४ झाडांसाठी २६ लाख ८४ हजार सुरक्षा अनामत महापालिकेच्या तिजोरीत ठेवण्यास मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी मंजुरी दिली. म्हणजे झाडांच्या संगोपनासाठी एकूण ८२ लाखहून अधिकचा निधी ठेवला जाणार असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.